दुचाकी आणि कार विक्री करणाऱ्या कंपनीविरुद्ध केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ, तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे जाणीवपूर्वक तक्रार देण्याची धमकी देत २० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन आरोपी विरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका वाहन विक्री करणाऱ्या कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापकांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी विजय म्हस्के आणि अविनाश रमेश रोकडे यां आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण वाहन विक्री करणाऱ्या कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक असून, ते सासवड परिसरातील एका गावात राहतात. संबंधित कंपनी ही त्यांच्या मावसभावाची असून त्यांच्या कंपनीचे कार विक्री करण्याचे दालन वारजे भागात आहे.तसेच वारजे परिसरात कंपनीचे सर्व्हिस सेंटर देखील आहे. या दालनातील सर्व जबाबदारी पाहण्याचे काम त्यांच्याकडे आहे. आरोपी विजय म्हस्के २०१७ मध्ये संबंधित कंपनीत काम करत होता. सहा महिने काम केल्यानंतर त्याने अचानक काम सोडून दिले होते. त्यानंतर म्हस्केने ११ मार्च रोजी व्यवस्थापकाच्या मोबाइल संपर्क साधला. कंपनीच्या कामासंदर्भात भेटायचे आहे, असे खोटे सांगून त्याने त्यांना मार्केट यार्ड भागातील एका हॉटेलमध्ये बोलावले. वारजे परिसरातील कंपनीच्या सर्व्हिस सेंटरनी पर्यावरणविषयक निकषांची पूर्तता केली नाही. कंपनीकडे याबाबतचे प्रमाणपत्रही नाही. याबाबत केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे जाणीवपूर्वक तक्रार देण्यात येणार आल्याचे सांगत याबाबत देण्यात आलेली नोटीस त्याने व्यवस्थापकाला दाखविली. या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा मी करणार आहे, असे म्हस्केने त्यांना सांगितले. त्यानंतर व्यवस्थापकाने म्हस्केला समजावून सांगितले. ‘तू कंपनीत काम केले आहे. विनाकारण त्रास देणे योग्य नाही,’ असे त्यांनी म्हस्केला समजावून सांगितले. त्यानंतर ‘मी नोटीस मागे घेतो, त्यासाठी काही तरी रक्कम द्यावे लागेल’, असे म्हस्केने त्यांना सांगितले. म्हस्केने त्यांना पुन्हा भेटायला बोलावले. ’याप्रकरणाचा नियमित पाठपुरावा करणार आहे. मंत्रालयात तक्रार देऊन तुमची कंपनी बंद पाडतो. पाठपुरावा न करण्यासाठी २० लाख रुपये द्यावे लागतील,’ असे त्याने सांगितले. म्हस्केच्या सांगण्यावरुन अविनाश रोकडेने त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. नोटीस मागे घ्यायची असेल तर २० लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी त्याने दिली. म्हस्के आणि रोकडे यांच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या व्यवस्थापकाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन तरडे पुढील तपास करत आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/YgkaQqD
वाहन कंपनीकडून 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांवर गुन्हा:प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्याची धमकी; माजी कर्मचाऱ्यासह एकावर कारवाई
April 05, 2025
0