भारतीय लष्करात असलेल्या साडेचार हजार आर्टिलरी ( ताेफखाना) अत्याधुनिक करण्यासाठी 15 वर्षापूर्वी नियाेजन करण्यात आले हाेते. परंतु त्याची सुरुवात आता हाेत असून पुण्यातील भारत फाेर्ज कंपनीला 307 अत्याधुनिक आर्टिलरी (ॲडव्हान्स टाेड अर्टिलरी सिस्टम (एटीएजीएस) निर्मिती करण्याचे काम देण्यात आले आहे. जेजुरी येथे त्यादृष्टीने नवीन प्लांट देखील लवकरच सुरु करण्यात येत आहे. भारताची सीमा सुमारे दाेन हजार किलाेमीटर असून सदर भागात वेगवेगळया प्रकाराचे हवामान व भाैगाेलिक परिस्थिती आहे अशाप्रसंगी आर्टिलरीचे महत्व अनन्यसाधारण आहे. रशिया -युक्रेन युद्धामुळे जगाला पुन्हा एकदा आर्टिलरीचे महत्व समजले असून जे लाेक आगामी युध्द हे केवळ सायबर युद्ध हाेईल असे सांगत हाेते त्यांना देखील आर्टिलरीचे महत्व समजले आहे असे मत नामांकित उद्याेजक बाबा कल्याणी यांनी बुधवारी पत्रकारांशी बाेलतना व्यक्त केले. यावेळी अमित कल्याणी, निलेश तुंगार उपस्थित हाेते. बाबा कल्याणी म्हणाले, युराेप मध्ये आतापर्यंत आम्ही 100 आर्टिलरी (एटीएजीएस) निर्यात केले असून त्यानंतर भारतीय लष्कारासाठी आर्टिलरी तयार करण्याचे काम आम्हाला मिळाले ही आनंदाची बाब आहे. युध्दात आर्टिलरीचे महत्व विशेष असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जाेड देऊन ते आता ॲटाेमेटिक यंत्रणेच्या आधारे बनवले गेले पाहिजे. शस्त्रविक्री निर्यात करणे ही सहज प्रक्रिया नसून त्याकरिता वेगवेगळया परवानगी घेणे आवश्यक आहे. युराेप सारख्या देशात तंत्रज्ञान उपलब्ध असले तरी त्यांच्यांकडे संरक्षण क्षेत्राशी संबंधित हार्डवेअर आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्याची कमी आहे. त्यामुळे आगामी काळात भारताला माेठी संधी या क्षेत्रात आहे. हलक्या वजनाचे रणगाडे करण्याचे देखील काम आम्ही हाती घेतले असून त्याची बांधणी अंतिम टप्प्यात येत आहे.यंदाच्या वर्षी ऑक्टाेबर महिन्यात त्याची प्रायाेगिक चाचणी घेतली जाईल. एटीएजीएस आर्टिलरीची आम्ही डीआरडीओ साेबत निर्मिती केली असून पाच हजार ताेफगाळयांचा मारा करुन त्याची क्षमता वेगवेगळया हवामानात सिध्द केली आहे. सन 2030 पर्यंत आर्टिलरी क्षेत्रात जगात सर्वाधिक प्रमाणात अर्टिलरी निर्मिती करण्याचे आमचे लक्ष्य आहे. आर्टफिशियल इंटेलिजन्स (एआय)चा वापर संरक्षण क्षेत्रात वाढत असून त्याचे संशाेधनाला प्राेत्साहन देण्यासाठी भारत फाेर्ज मध्ये लॅब देखील सुरु करण्यात आली असून माेठा निधी त्याकरिता गुंतविण्यात आला आहे. एआयचा वापर करुन छाेटया पिस्तुल निर्मिती करण्याचे देखील आमचे लक्ष्य आहे की, ज्या ठरवून दिलेल्या लक्ष्याचा अचूक भेद घेतील. स्मार्ट राेबाेटिक्स निर्मितीवर देखील आम्ही काम करत असून काही संरक्षण साधनांची निर्मीती करण्यात आली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/LQ6UH23
भारत फोर्जकडून लष्करासाठी 307 अत्याधुनिक तोफा,जेजुरीत नवा प्लांट उभारणार:रशिया-युक्रेन युध्दामुळे जगाला आर्टिलरीचे महत्व पुन्हा अधाेरेखित झाले- बाबा कल्याणी
April 03, 2025
0