हिंगोली शहरालगत गंगानगर भागात सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी सव्वा लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली अाहे. या प्रकरणी गुरुवारी ता. २४ दुपारी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरालगत गंगानगर भागात सेवा निवृत्त उपनिरीक्षक तुकाराम जाधव यांचे घर आहे. ता. १५ एप्रील रोजी जाधव कुटुंबिय घराला कुलुप लाऊन नांदेड जिल्हयातील लोहा येथे नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी गेले होते. यावेळी घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घराच्या चॅनलगेट व मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील साहित्याची नासधुस केली. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले दहा ग्राम वजनाचे सोन्याचे गहु मणी, १० ग्राम वजनाची सोन्याची एकदानी, प्रत्येकी पाच ग्राम वजनाच्या सोन्याच्या सहा अंगठ्या, प्रत्येकी एक ग्राम वजनाचे सोन्याचे दहा वेढ, दहा ग्राम चांदीचे दोन शिक्के व रोख रक्कम चोरट्यांनी पळविली. दरम्यान, आज सकाळी जाधव कुटुंबिय बाहेरगावावरून परत आल्यानंतर त्यांना घराच्या चॅनल गेटचे कुलुप तुटलेले दिसून आले. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आत जाऊन पाहिले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी दुपारी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक सुरेश दळवे, पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, जमादार बाळासाहेब खोडवे, आकाश पंडीतकर, रमेश जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देेऊन पाहणी केली. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. मात्र श्वान पथक घटनास्थळीच घुटमळले. तर ठसे तज्ञांनी घटनास्थळावरून चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/PxHTyAn