नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. जुन्या गिट्टी खदानीत पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये दोन महिला व दोन बालकांचा समावेश आहे. घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. रज्जू ऊर्फ रंजना सूर्यकांत राऊत (22), रोशनी चंद्रकांत चौधरी (32), तिचा मुलगा मोहित (10), मुलगी लक्ष्मी (8) अशी मृतांची नावे आहेत. चौघेही धुळ्यातील लक्ष्मी नगरचे रहिवासी असून, रज्जू राऊत ही नागपूरच्या गुजरवाडीतील असून तिचे वडील सूर्यकांत राऊत चहाच्या टपरीवर काम करतात. अन्य एक मृत तरुणाचे नाव एहतेशाम मुक्तार अन्सारी (वय २०) आहे. वडिलांकडे गृह प्रवेशाचा कार्यक्रम असल्याने रोशनी चौधरी आपल्या मुलांसह 4 मे रोजी माहेरी आली होती. रविवारी दुपारी 2 वाजता ती आपल्या मुलगा, मुलगी आणि लहान बहीण रज्जू यांच्यासह घराबाहेर गेली. त्यांच्या सोबत एहतेशाम अन्सारी हा युवक सुद्धा गेला होता. मात्र, संध्याकाळ उलटल्यानंतरही हे पाचही जण घरी परतले नाहीत. राऊत आणि अन्सारी दोन्ही कुटुंबांनी रात्री उशिरापर्यंत आप्तस्वकीय, मित्रपरिवारांकडे शोध घेतला. पण कुठेही काहीच माहिती मिळाली नाही. रविवारी रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने दोन्ही कुटुंबीयांनी चिंतेने पोलिस ठाणे गाठले. गणेशपेठ आणि कुही पोलिस ठाण्यांमध्ये हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. यामध्ये सायबर सेलचीही मदत घेण्यात आली. सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कुही फाट्यानजीक असलेल्या गिट्टी खदान परिसर ट्रेस झाला. पोलिस आणि कुटुंबीयांनी गिट्टी खदान परिसराकडे धाव घेतली. गिट्टी खदान परिसरात एका दुचाकीसह चपला आणि कपडे पडून होते. तर खदानीतील पाण्यावर रोशनी चौधरी हिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असताना इतर चार जणांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/1iRzw2b
पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू:मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश, गृहप्रवेशासाठी आले होते नागपुरात
May 12, 2025
0