घरात देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या नोकरांनी ज्येष्ठ नागरिकाची बनावट सही करुन बँक खात्यातून परस्पर ३५ लाख ५१ हजारांची काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोन आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आदित्य संजय मोरे (रा. पाषाण) आणि आकाश ज्ञानेश लिमकर (रा. वारजे माळवाडी )अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत एका ज्येष्ठ ७१ वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे पती आजारी आहेत. त्यांची देखभाल, तसेच शुश्रूषेसाठी आरोपी लिमकर आणि मोरे यांना नेमण्यात आले होते. सप्टेंबर २०२३ पासून दोघे जण त्यांच्याकडे कामाला होते. दोघांनी त्यांच्या आजारपणाचा फायदा घेतला. ज्येष्ठ महिलेच्या पतीचे नाव असलेली धनादेश पुस्तिका, तसेच डेबिट कार्ड नकळत चोरले. धनादेशावर बनावट सही करुन त्यांच्या खात्यातून वेळोवेळी ३५ लाख ५१ हजार रुपये काढून घेतले. फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ज्येष्ठ महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत. घरफोडीत पाच लाखांचा ऐवज चोरी पुणे शहरातील मित्रमंडळ कॉलनीतील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाख चार हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पर्वती पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नितीश मेहता (वय ३५, रा. अनंत बिल्डिंग, मित्रमंडळ कॉलनी, गल्ली क्रमांक १, पर्वती पायथा) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहता व्यावसायिक आहेत. मेहता यांची सदनिका बंद होती. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाट उचकटले. कपाटातील पाच लाख चार हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार तपास करत आहेत. पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/6TFgbiW