आपला देश स्वतंत्र होण्याच्या अगोदरचा 1935 चा तो कालखंड. 1935 साली भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे प्रतिनिधी म्हणून मुंबई प्रांतिक वर निवडून गेलेले सातारचे खंडेराव सखाराम सावंत. हे चांगले शिल्पकार. त्यांनी महात्मा गांधी यांच्यासमोर वर्धा येथील आश्रमात एक आठवडा बसुन त्यांचे शिल्प तयार केले आणि महात्मा गांधी यांनी या सातारच्या शिल्पकाराचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायाचे कौतुक केल्याचे शिफारस पत्रही दिले. हा ठेवा आजही खंडेराव सावंत यांच्या कुटुंबीयांनी जपून ठेवला आहे. खंडेराव सावंत हे मुळचे सातारा तालुक्यातील. नंतर ते सातारा शहरातच स्थायिक झाले. सातारच्या रविवार पेठेत आजही त्यांचे घर असून तिथे त्यांची मुले राहतात. आपले प्राथमिक शाळेतील शिक्षण संपल्यावर माध्यमिक शाळेसाठी खंडेराव सावंत हे सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकण्यासाठी आले. रोज ते क्षेत्र माहुली पासून सातारला न्यू इंग्लिश स्कूल पर्यंत चालत येत असत. शालेय शिक्षण संपल्यावर डॉ आंबेडकर यांच्या प्रेरणेसह मिळालेल्या मदतीच्या जोरावर मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये १९२८ मध्ये त्यांनी प्रवेश घेतला १९३३ अखेर आपला पाच वर्षाचा चित्रकलेचा शिल्पकलेचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांना या कलेचा डिप्लोमा ही मिळाला. डिप्लोमा मिळाल्यानंतर खंडेराव सावंत हे नामवंत चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्याकडे कोल्हापूरला गेले व त्यांनी प्रभात फिल्म कंपनीच्या आर्ट खात्यात कामाला सुरुवात केली. तेथे काही दिवस काम केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खंडेराव सावंत यांना सातारा जिल्ह्यातील स्वतंत्र मजूर पक्षातर्फे मुंबईच्या कायदे मंडळासाठी मुंबई प्रांतिक साठीचे उमेदवार म्हणून उभे केले. कायदेमंडळावर निवडून आल्यानंतर त्यांनी तेथे काम सुरू केले. मात्र डोक्यात सारखे विचार शिल्पकलेचे असल्याने व त्यांच्या डोक्यात महात्मा गांधी यांचे शिल्प त्यांच्यासमोर बसून तयार करणे हे असल्याने त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पत्र घेऊन थेट वर्धा गाठला आणि वर्धा येथे महात्मा गांधींकडे त्यांचा अर्ध पुतळा तयार करण्यासाठी रवाना झाले. महात्मा गांधी यांनी खंडेराव सावंत यांना एका अटीवर त्यांच्यापाशी ठेवून घेतले. ती अट म्हणजे त्यांनी आपल्या दररोजच्या कामात यत्किंचितही व्यत्यय आणायचा नाही या अटीवर ते तयार झाले. खंडेराव सावंत हि या गोष्टीला तयार झाले. महात्मा गांधी हे त्यांच्या खोलीत काम करत बसायचे आणि तिकडे एका कोपऱ्यात खंडेराव सावंत त्यांची प्रतिमा तयार करत समोर बसलेले असायचे. महात्माजी प्रत्यक्ष बसलेले असताना त्यांचा पुतळा तयार करण्याचे काम खंडेराव सावंत करत असत. हे आठवडाभर सुरू होते. आठ दिवसानंतर खंडेराव सावंत यांनी महात्मा गांधी यांचा अर्ध पुतळा तयार केला. महात्मा गांधी व खंडेराव सावंत यांचे शिल्प तयार करत आहेत हे छायाचित्र दुर्मिळ आहे. महात्मा गांधींनी खंडेराव सावंतांना दिले शिफारस पत्र महात्मा गांधी यांनी यासंदर्भात दि.३०/०९/ १९३५ रोजी एक शिफारस पत्र खंडेराव सावंत यांना दिले. या शिफारस पत्रात त्यांनी म्हटले आहे की , " Shri K.S. Sawant was with me for nearly a week. He is Harijan and sculptor by profession , having gone, through the full course in the Bombay school of art. I could not racists his appeal to be allowed to seat in my room and do his work without disturbing my attention in any way. He had his hearts wish and he made the fullest use of the opportunity. Experts alone can judge his art. But I could see that Shri Sawant had varied gifts. He showed great application all the time he was with me and was entirely absorbed in his work. We found him to be thoroughly sociable and become one of us the moment he came. He deserve encouragement from lovers of art and monied men. I wish him every success. Sd. M. K. Gandhi महात्मा गांधी यांचे आशीर्वाद व शिफारस खंडेराव सावंत आयुष्यभर विसरले नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचा एक प्रतिनिधी महात्मा गांधी यांच्या वर्धा येथील आश्रमात महात्माजींच्या समोर बसून त्यांचा पुतळा तयार करतो, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व महात्मा गांधींच्या अनुयायांनी खरे तर चिंतन करण्यासारखे आहे. खंडेराव सावंत यांनी महात्मा गांधी यांचा पुतळा जसा तयार केला त्याचप्रमाणे पुणे येथील स्टेशन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा तयार केला आहे. तो पुतळा बसवण्यापूर्वी पुतळ्याशेजारी उभे राहून खंडेराव सावंत यांनी छायाचित्रही काढले आहे. शिल्पकलेतील जसे ते निष्णात होते तसेच नखचित्रही काढण्यात ते अतिशय निष्णात नख चित्रकार होते. अनेक नखचित्रे त्यांच्या खजान्यात आहेत व ती कुटुंबीयांच्याकडे आहेत. या नखचित्रांमध्ये त्यांनी काढलेले पंडित जवाहरलाल नेहरू तसेच अजंठा येथील शिल्प चित्राची काढलेले नखचित्र हेही आहे. खरे तर हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे खंडेराव सावंत यांचा मंगळवार दिनांक ६ मे २०२५ रोजी स्मृतिदिन आहे. खंडेराव सावंत यांची काही नखचित्रे
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/dMioKxq
आंबेडकरांच्या अनुयायाने बनवले महात्मा गांधींचे शिल्प:वर्धा येथील आश्रमात बसून शिल्पाला दिला आकार, जाणून घ्या कोण आहेत शिल्पकार खंडेराव सावंत
May 05, 2025
0