Type Here to Get Search Results !

परब आणि देसाईंत खडाजंगी:विधानभवन प्रवेश पास 10 हजारांना विक्री- शिंदे, सभापतींकडून नि:पक्ष चौकशीचे आदेश

विधानभवनाच्या लॉबीत आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत झालेल्या हाणामारीचे परिषदेत तीव्र पडसाद उमटले. अधिवेशनकाळात विधानभवनात प्रवेशासाठी दिले जाणारे प्रवेश पास ५ ते १० हजार रुपयांना विकले जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. यावरून मंत्री शंभूराज देसाई आणि ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. या पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे यांनी या संपूर्ण प्रकाराची नि:पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधिमंडळात झालेल्या राड्याबाबत २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला. आव्हाड व पडळकर सर्मथकांनी केलेला राडा विधिमंडळासाठी लाजिरवाणी बाब आहे. विधानभवनात मकोकाचे आरोपी येत आहेत, गुन्हेगारी वृत्तीचे लोक येत असल्याने संसदीय परंपरेला यामुळे ठेच लागली आहे. सर्वांनी याची खबरदारी घेण्याची गरज आहे. हा सर्व प्रकार निषेधार्थ असला तरी पोलिस एकांगी कारवाई करताना दिसत आहेत. एक पोलिस तर त्या घटनेतील एका व्यक्तीला विधानभवनाच्या आवारात तंबाखू मळून देतो आहे. कोणत्या राज्याचे आपण अनुकरण करत आहोत, असा प्रश्न दानवे यांनी या वेळी विचारला. तसेच विधानभवन सर्वोच्च आहे, सर्वांनी या प्रकरणाची दखल घेऊन कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. सदस्य शशिकांत शिंदे म्हणाले की, सभापतींनी गेटपास बंद करावेत, असे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानंतरही गेटपास देण्यात आले. हे पास कुणी दिले त्याची चौकशी करावी. विधानभवनाच्या परिसरात इतकी गर्दी कशी आली? मकोका, गुन्हेगारी वृत्तीचे लोक कायद्याला धाब्यावर बसवून आत येत आहेत. अधिवेशनकाळात प्रवेशासाठी पैसे घेतले जातात. ५ ते १० हजार रुपयांना पास विकले जात आल्याचा आरोप शिंदे यांनी केला. त्यानंतर सभापती यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वातावरण काहीसे शांत झाल्याचे पहायला मिळाले. पुरावा द्यावा, कारवाई करू : शंभूराज देसाई आमदार प्रवीण दरेकर, मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यावर आक्षेप घेत, आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात शाब्दिक चकमक झाली. परब यांनी “पास कसे आणि कुठून विकले जातात, याची सर्व माहिती आमच्याकडे आहे,’ असे ठणकावले. यावर देसाई यांनी पुरावा द्यावा, कारवाई करू, असे प्रत्युत्तर दिले. या प्रकरणावर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, विधिमंडळाचा स्तर खाली जाऊ नये, विधानमंडळाच्या प्रतिष्ठेला तडा जाऊ नये. सर्वांनी संयम राखावा.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/o0eL2Dp

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.