Type Here to Get Search Results !

शालार्थ आयडी घोटाळ्यात 8 आरोपींवर दोषारोपपत्र:मुख्य सूत्रधार वाघमारेच्या अटकेबाबत विजय वडेट्टीवारांचे पोलिस आयुक्तांना पत्र

राज्यभरात गाजत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्यातील आठ आरोपींविरूद्ध सदर पोलिसांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कोट क्र. ६ यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. इतर आरोपीही लवकरच गजाआड होतील असे सदर पोलिसांनी सांगितले. शिक्षक घोटाळ्यातील आरोपींविरूद्ध सदर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७२, ४०९, १२० ब, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणांत आतापर्यत यवतमाळ, भंडारा, गोंदीया व नागपूर जिल्ह्यातील पराग नानाजी पुडके (वय ३३), उल्हास कडूजी नरळ (वय ५४), निलेश शंकरराव मेश्राम (वय ५२, नागपूर), संजय शंकरराव बोधाडकर (वय ५३, वडगाव रोड यवतमाळ), सुरज पुंजाराम नाईक, वय ४० नागपूर), महेंद्र भाऊराव महेशकर (वय ४३, नागपूर), राजू केवडा मेश्राम (वय ५९, गोंदिया), चरण नारायण जेटूले (वय ६३, भंडारा) यांचा समावेश आहे. या गुन्ह्यात भंडारा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी (सध्या नेमणूक शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय गडचिरोली) कार्यालयातील अधीक्षक रवींद्र पंजाबराव सलामे वय ४५, नेहरूनगर, भोजापूर, जिल्हा भंडारा) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपी पराग नानाजी पूडके याला कधीही कोणत्याही शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक पदावर नियुक्ती नव्हती. असे असताना नानाजी पूडके विद्यालयात सलामे यांच्या बनावट नियुक्ती आदेशाने मुख्यध्यापक म्हणून रूजू झाला. एस. के. बी. शाळा, यादव नगर नागपूर या शाळेच्या लेटरहेडवर बनावट अनुभव प्रमाणपत्र गुन्ह्यातील अटक आरोपी महेंद्र म्हैसकर सोबत कट कारस्थान रचून जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. वडेट्टीवारांनी व्यक्त केली नाराजी राज्यभरात गाजत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार नीलेश वाघमारे अटकेपासून अजूनही दूर आहे. नागपूर पोलिस वाघमारेला अजूनही अटक करू शकले नाही, याबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र विधिमंडळ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांना लिहिले आहे. पोलिसांकडून वाघमारेला अटक करण्याचे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही, ही खेदाची व संशयास्पद बाब आहे. वाघमारेला अटक न करता फरार राहण्याची संधी देणे अनाकलनीय असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. वाघमारेला अटक करण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालावे असेही वडेट्टीवारांनी म्हटले आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/KrcF3wb

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.