आपल्या लिखाणाने कोणाची बदनामी होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. आरोपांच्या बातम्या प्रकाशित करताना दोन्ही बाजूंचा समावेश असावा. जबाबदारीची पत्रकारिता ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त गजानन निमदेव यांनी केले. विश्व संवाद केंद्र, अमरावतीद्वारे आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंतीनिमित्त अमरावती विभाग पत्रकारिता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री हव्याप्र मंडळाच्या सभागृहात आयोजित या सोहळ्यात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून कॉलेज ऑफ अॅनिमेशन बायोइंजिनियरींग अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक संचालक विजय राऊत उपस्थित होते. याशिवाय मंचावर रा. स्व. संघाचे महानगर संघचालक उल्हास बपोरीकर, विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख संदीप गुळवे, खासदार अनिल बोंडे या कार्यक्रमाला विशेषत्वाने उपस्थिती होती. छत्रसाल विकास मंडळाचे अध्यक्ष गोपाल गुप्ता पुरस्कृत उत्तम लेखन व पत्रकारितेसाठी निशिकांत राजबिंडे, स्व. त्रिवेणी सुखदेवराव बोंडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्रिवेणी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विश्वस्त डॉ. वसुधा अनिल बोंडे पुरस्कृत ग्रामीण भागातून तत्परतेने वृत्त संकलनासाठी धामणगाव रेल्वेचे चेतन पसारी, स्व. रमेशचंद्र शिंदे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. चंद्रकांत शिंदे पुरस्कृत डिजिटल माध्यमात नेटाने परिश्रमपूर्वक कार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार यशवंत उर्फ अशोक जोशी यांना देवर्षी नारद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार पुरस्कृत करणारे यावेळी आवर्जून उपस्थित होते. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, ११ हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विजय राऊत म्हणाले, पत्रकारिता हे समाजाचा खरा चेहरा दाखवणारे क्षेत्र आहे. त्यामुळे मी सुद्धा चित्रकार असूनही पत्रकारिता करतो. कारण चित्रांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केदार गोगरकर, सूत्रसंचालन अमरावती विभाग प्रचार प्रमुख सौरभ लांडगे यांनी केले. आभार अमरावती महानगर प्रचार प्रमुख राहुल गुल्हाने यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता शिवानी भेंडारकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली. कार्यक्रमाला प्रचार विभागाचे सर्व सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/H39B4dE
पत्रकारांचा विशेष सन्मान सोहळा:देवर्षी नारद जयंतीनिमित्त तीन पत्रकारांना पुरस्कार प्रदान
July 01, 2025
0