पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता हा शहराची शान असणारा भाग आहे. अलीकडच्या काळात या ठिकाणी रात्री उशिराने येऊन बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे प्रकार वाढले आहे. हे विक्रेते बाहेरील लोक आहेत, त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महानगरपालिका आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. देशातील कुठल्यातरी राज्याच्या नावावर बेकायदेशीररीत्या भारतात आलेले आणि पुणे शहरात फर्ग्युसन रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या लोकांमुळे सुरक्षिततेचे प्रश्न उपस्थित होत असतील तर त्यांना विरोध केला जायलाच हवा, असेही त्यांनी नमूद केले. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शिरोळे यांनी उपस्थित केलेल्या शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत माहिती देण्याकरीता आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिरोळे बोलत होते. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर रात्री नऊ नंतर वेगळेच लोक येऊन लहान खोक्यांमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करत असतात, हे लोक स्थानिक नसून बाहेरून आलेले आहेत. इथे विक्री करण्याचा व्यवसाय ते बेकायदेशीरपणे करत आहेत, त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आपण महानगरपालिका आणि पोलीस आयुक्त या दोघांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली असल्याचे शिरोळे यावेळी म्हणाले. शिवाजीनगर बसस्थाकाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिरोळे म्हणाले, बसस्थानकाच्या विकासाचे काम हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून सुरु आहे. या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट लिझ जर अधिक काळ ठेवता आले, तर त्याचा फायदा होणार आहे. सध्या त्यावर काम सुरु असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना हे काम रेंगाळले होते. आपण या कामात कोणताही खोडा घालत नसून हे काम मार्गी लावण्याचे पूर्ण प्रयत्न आहे. पुणे विद्यापीठ चौकात उभारण्यात आलेल्या पुलापैकी एका पुलाचे म्हणजे राजभवनापासून ते ईस्क्वेरकडे येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. येत्या महिन्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असून त्याचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. बाणेर आणि पाषाणकडे जाणाऱ्या पुलाचे काम देखील अंतिम टप्यात आले असून ते देखील लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती शिरोळे यांनी दिली. शिवाजीनगर येथील आकाशवाणी चौकातील मेट्रोचा खांब हा वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे, त्यामुळे त्यावर कोणता पर्याय काढता येईल, यावर चर्चा सुरु असून त्यावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/EWg058y
फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर अनधिकृत विक्रेत्यांचा वावर:आमदार शिरोळेंची पोलीस व महापालिकेकडे कारवाईची मागणी
July 22, 2025
0