Type Here to Get Search Results !

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण:विद्यार्थ्यांना सामाजिक जाण आणि ज्ञान देणे महत्त्वाचे - डॉ. पराग काळकर

पुणे - अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक-पुणे केंद्राच्या वतीने 'आदर्श शिक्षक पुरस्कार' आणि विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण समारंभ वरदश्री सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले. डॉ. काळकर म्हणाले, "भारत हा तरुणांचा देश आहे. या देशातील तरुणांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देणे हे आपल्या सर्वांचे दायित्व आहे." त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअर होतो, शंभर वर्षे टिकणारा पूल बांधतो. परंतु त्या परिसरात राहणाऱ्या लोकांचे प्रश्न मात्र वर्षानुवर्षे तसेच राहतात." कार्यक्रमात सानिया पोतदार, माधवी निबंधे, संजय करंदीकर आणि उमेश गालिंदे यांना 'आदर्श शिक्षक पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. सुमेधा सरदेसाई यांच्या माध्यमातून ही रोख पारितोषिके देण्यात आली. त्या गेली पाच वर्षे मराठी आणि संस्कृत विषयांत पीएच.डी., एम.ए. आणि बी.ए. मध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देत आहेत. डॉ. काळकर यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व समजावून सांगितले. ते म्हणाले, "आज भारतीयांचे आठ तास मोबाईलमध्ये जातात. उर्वरित वेळ आपण कशासाठी वापरतो, याचा विचार करणे आवश्यक आहे." त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या वेळेतील १ टक्का वेळ वाचनासाठी आणि १ टक्का वेळ आरोग्यासाठी देण्याचा सल्ला दिला. पुरस्काराला उत्तर देताना सानिया पोतदार म्हणाल्या, "लहानपणापासूनच मला शिक्षक व्हायचे होते. शालेय जीवनातील वय हे आयुष्याला कलाटणी देणारे असते." त्यांनी शाळकरी मुलांना शिकवताना त्यांना व्यक्ती म्हणून घडविणे आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करणे याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष कुंदनकुमार साठे, कार्यवाह विश्वनाथ भालेराव, शैक्षणिक प्रमुख राजेंद्र देवधर, केंद्रप्रमुख मकरंद माणकीकर, तसेच शिरीष आठल्ये, उल्हास पाठक, मुकुंद जोशी, माधव ताटके, परेश मेहंदळे, अनिल शिदोरे, शारंगधर अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/AmCp2X1

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.