कोंढव्यात कुरियर बॉयने एका युवतीवर अत्याचार केल्याचे प्रकरण संबंधित तरुणीचा खोडसाळपणा असल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी पोलिसांनी तरुणीच्या मित्राला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर आले आहे. पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणीवर कारवाई करण्याच्या विचारात पोलिस आहेत. गृह मंत्रालयाने आणि राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपासाचे आदेश दिले. या दरम्यान तरुणी चौकशीला सहकार्य करत नव्हती. पोलिसांनी मोबाईल लोकेशन्स, सीसी टीव्ही फुटेज तसेच घटनेच्या वेळी कोणते मोबाईल फोन चालू होते, त्याबाबतचे तांत्रिक विश्लेषण केले. या तपासात बाणेरमधील एका आयटी अभियंत्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर या युवतीने कुभांड उघडकीस आले. हा अभियंता व ती तरुणी एकाच समाजाचे असून वधू वर परिचय संमेलनात उभयतांची वर्षभरापूर्वी ओळख झाली. त्यानंतर, ते नियमित संपर्कात आले. हा अभियंता तिच्या घरी नेहमी येत असे. दोघे एकत्र फिरायलाही जात असत. त्यांचा दररोज परस्परांशी संपर्क होता. घडना घडली त्या दिवशी सायंकाळी त्यांच्यात झालेल्या बोलण्यानुसारच हा अभियंता तरुण तिच्या घरी गेला होता. तेथून तो रात्री साडेआठच्या सुमारास बाहेर पडला. त्यानंतर, दोन तासांनी या युवतीने पोलिसांकडे अत्याचार झाल्याची फिर्याद दिली.दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून पीडितेचे मानसोपचार तज्ज्ञाकडून समुपदेशन केले जात असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/O5eBEIX
संतापजनक:पुणे अत्याचार प्रकरणात तरुणीचा खोडसाळपणा; मित्राविरुद्ध तक्रार
July 04, 2025
0