भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक ज्ञात-अज्ञात वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. यापैकीच एक तेजस्वी नाव म्हणजे शिरीषकुमार मेहता. महात्मा गांधींनी इंग्रजांविरोधात पुकारलेल्या 'चले जाव' आंदोलनात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या या युवकाचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी या बालवीराने भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी दाखवलेले शौर्य आजही अनेकांना प्रेरणा देते. नंदुरबारमध्ये बाळा शंकर इनामदार नावाचे एक व्यापारी होते. त्यांचा तेलाचा व्यवसाय होता. त्यांना मुलगा नसल्यामुळे ते थोडे दुःखी होते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह केला, पण त्यांना कन्या झाली. या कन्येचा विवाह त्यांनी पुष्पेंद्र मेहता यांच्याशी करून दिला. 1924 साली पुष्पेंद्र आणि सविता यांचे लग्न झाले. 28 डिसेंबर 1926 रोजी या दांपत्याच्या पोटी, मेहता घराण्यात शिरीषकुमार यांचा जन्म झाला. शिरीषकुमार यांचे आई-वडील दोघेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. त्यांची आई सविताबेन या राष्ट्र सेवा दल या स्थानिक संघटनेच्या अध्यक्षा होत्या, तर वडील पुष्पेंद्रभाई नंदूरबारमधील काँग्रेस कमिटीचे नेते होते. त्यामुळे त्यांचे बालपण देशभक्तीच्या वातावरणात गेले. आईकडून स्वातंत्र्यलढ्याच्या कथा ऐकून, तसेच सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्या विचारांनी ते प्रेरित झाले. अवघ्या 12 व्या वर्षी त्यांनी आजोबांसोबत तिरंगा फडकावून स्वातंत्र्य चळवळीत आपला सहभाग नोंदवला होता. महात्मा गांधींनी 9 ऑगस्ट 1942 ला इंग्रजांना ‘चले जाव’चा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या, ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. त्या काळात "वंदे मातरम्' आणि "भारत माता की जय' असा जयघोष करणाऱ्या कोणालाही पोलिस अटक करू शकत होते. बरोबर महिनाभरानंतर, 9 सप्टेंबर 1942 ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. शिरीषकुमार यांच्या शौर्याने साने गुरूजीही प्रभावित शिरीषकुमार यांच्याविषयी साने गुरूजींनी गोष्ट लिहिली. यामागचा उद्देश तरुण पिढीला स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळावी हा होता. साने गुरूजी त्यांच्या गोष्टीमध्ये लिहितात, 9 सप्टेंबर 1942 ची ती सकाळ. आजीने शिरीषला हाक मारली. “शिरीष, येतोस का लाडू वळायला ?" शिरीष म्हणाला, “आजी, आज मला शाळेत लवकर जायचे आहे. झेंडा घेऊन आम्ही सारे शाळेतून बाहेर पडू आणि मिरवणूक काढू. आज 9 सप्टेंबर. महिना झाला 'चले जाव' चळवळीला." त्यावर आजी म्हणाली, “इंग्रज या देशातून जाईल का ?" शिरीष म्हणतो, “आम्ही त्याला घालवू. त्यासाठी वाट्टेल ते करू अथवा मरू !" त्यानंतर शिरीष आजीला लाडू वळायला मदत करू लागला. घड्याळात अकरा वाजले. ताडकन शिरीष उठला. “आजी, जातो ग," असे म्हणून तो शाळेत निघून गेला. शाळेच्या मैदानात मुले आली होती. शिरीष येताच सारी त्याच्याभोवती जमली. त्यावेळी ब्रिटिश सरकारने मिरवणुकीला, झेंडा न्यायला बंदी घातली होती. शाळेतील मुलांकडे असलेला झेंडा घेण्यासाठी एक पोलिस तिथे आला. शिरीषने सर्वांना गोलाकार उभे केले. एकाच्या हातात झेंडा दिला. इतक्यात एक पोलिस झेंडा हिसकवायला आला. त्या मुलाने तो दुसऱ्याच्या हातात दिला. पोलिस तेथे गेला तोच, झेंडा तिसऱ्याच्या हातात. पोलिस चिडला आणि तणतणत निघून गेला. पोलिस चिडून निघून गेल्यानंतर सर्व मुलांनी जयजयकार केला. करेंगे या मरेंगे, चालीस कोट नहीं दबेंगे' अशी घोषणाबाजी केली. पोलिस निघून गेल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषने प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या, "नहीं नमशे, नहीं नमशे', "निशाण भूमी भारतनु'. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. दारांतून, खिडक्यांतून मोठी माणसे लहान मुलांची हिंमत पाहत होती. मिरवणूक मुलींच्या शाळेजवळ आली. वर्गावर्गांतून सगळ्या मुली बाहेर पडल्या. जयघोष करत त्या मिरवणुकीत सामील झाल्या. मिरवणूक कोर्टाजवळ आली आणि शिरीषने तेथे भाषण सुरू केले. वकील मंडळी बाहेर येऊन ऐकू लागली. भाषण संपले आणि मिरवणूक पुढे गेली; तेवढ्यात पाठीमागून लाठीमार आणि गोळीबार करत पोलिस आले. मुलींवर काय गोळ्या झाडता, आधी मला मारा मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. मुलांची पांगापांग झाली. काही धीट मुले उभी होती. काही मुली न भिता, न पळता गल्लीच्या तोंडाशी उभ्या होत्या. शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि "भारत माता की जय', "वंदे मातरम्'चा जयघोष सुरूच ठेवला. पोलिसांनी मुलींच्या दिशेने पिस्तुल रोखले. तेवढ्यात विजेप्रमाणे शिरीष तेथे आला आणि म्हणाला, "हिंमत असेल तर माझ्यावर गोळी झाडा. मुलींवर काय गोळ्या झाडता? ही माझी छाती उघडी आहे." अधिकाऱ्याने चिडून गोळी झाडली; पण नेम चुकला. “जरा नीट नेम धरा. गोळ्या संपल्या नाहीत ना ?" असे शिरीष उपहासात्मक म्हणाला. संतापलेल्या अधिकाऱ्याने जवळून गोळ्या घातल्या. शिरीषच्या छातीत तीन गोळ्या बसल्या. तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले. शिरीषकुमार यांच्या शौर्याची दखल घेत साने गुरूजींनी शहीद झालेले शिरीषकुमार, लालादास, धनसुखलाल, शशिधर आणि लहानगा घनश्याम यांच्या नावे शहीद स्तंभ उभारण्यास सांगितले. त्यानुसार शहिदांच्या गौरवार्थ नंदूरबार शहराच्या मध्यवर्ती भागात मंगळ बाजार परिसरात स्मारक उभारण्यात आले. हे स्मारक आजही अनेकांना प्रेरणा देते. चले जाव चळवळीचा उदय व पार्श्वभूमी 1942 साल हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात एक निर्णायक वर्ष ठरले. जगात दुसरे महायुद्ध सुरु होते, या युद्धात ब्रिटिश साम्राज्याची शक्ती कमी होत चालली होती आणि भारतीय स्वातंत्र्याच्या मागणीने नवा उमेदीचा टप्पा गाठला होता. 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहानंतर आणि 1932 च्या पूना करारानंतर आंदोलनात काहीसा खंड पडला होता, परंतु 1942 मध्ये गांधीजींनी "भारत छोडो"चा नारा देत लढ्याला नवजीवन दिले. 1942 ची ती संध्याकाळ, मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर लाखोंचा जनसमुदाय जमला होता. भारतभर स्वातंत्र्याची लाट उसळली होती आणि आता एका निर्णायक लढ्याची वेळ आली होती. महात्मा गांधी व्यासपीठावर उभे राहिले आणि त्यांच्या 'करेंगे या मरेंगे' या घोषणेने उपस्थितांमध्ये चैतन्याची नवी लाट पसरली. याच मैदानावरून ‘चले जाव’ आंदोलनाची घोषणा झाली आणि ब्रिटिश राजवटीच्या समाप्तीची सुरुवात झाली. या घोषणेने देशभरात एक मोठा संघर्ष पेटला. हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभरातील तुरुंग भरले, आणि भूमिगत आंदोलकांनी ब्रिटिश सरकारला हैराण करून सोडले. हे आंदोलन म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक मैलाचा दगड ठरला. 8 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झालेल्या या आंदोलनाने ब्रिटिश राजवटीला हे स्पष्ट केले की आता त्यांना भारतातून जावेच लागेल. 'भारत छोडो' आंदोलन हे केवळ एक आंदोलन नव्हते, तर ते कोट्यवधी भारतीयांच्या स्वातंत्र्याच्या स्वप्नांचे प्रतीक होते. या आंदोलनाने स्वातंत्र्याची पहाट जवळ आणली आणि अवघ्या पाच वर्षांतच भारताला स्वातंत्र्य मिळाले. 14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत ‘छोडो भारत’ चळवळ सुरू करण्याचा ठराव संमत करण्यात आला. या चळवळीचे उद्दिष्ट स्पष्ट होते आणि ते म्हणजे ब्रिटिशांनी तात्काळ भारतातून निघून जावे, स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय जनतेला मिळावा. चले जाव चळवळीत महाराष्ट्राचे योगदान थोडक्यात 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर (सध्याचे ऑगस्ट क्रांती मैदान) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे विशेष अधिवेशन भरले. या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी "चले जाव" चळवळीचा ठराव मांडला आणि तो संमत झाला. याच अधिवेशनात महात्मा गांधींनी भारतीय जनतेला थेट "करा किंवा मरा" (करेंगे या मरेंगे) हा संदेश दिला. त्यांचा सूर स्पष्ट आणि ठाम होता की, "ब्रिटिशांनी भारत सोडून ताबडतोब निघून जावे." गांधीजींचा हा संदेश जनतेच्या मनात पेटलेली स्वातंत्र्याची मशाल अधिक प्रज्वलित करणारा ठरला. 1. मुंबईतील आंदोलन 1942 मध्ये मुंबई हे आंदोलनाचे प्रमुख केंद्र होते. येथे 'सेंट्रल डिरेक्टोरेट' ही भूमिगत कार्यकर्त्यांची मध्यवर्ती संस्था स्थापन झाली. ब्रिटिशांचे गुप्तचर जाळे चुकवत, या संस्थेने चळवळीचे नियोजन केले. डॉ. वसंत अवसरे हे बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी भूमिगत झाले. उषा मेहता, विठ्ठलदास जव्हेरी, चंद्रकांत जव्हेरी या कार्यकर्त्यांनी "आझाद रेडिओ" हे गुप्त रेडिओ स्टेशन सुरू केले. या रेडिओवरून आंदोलनाच्या बातम्या, देशभक्तीपर संदेश, आणि प्रेरणादायी भाषणे प्रसारित केली जात. ब्रिटिश सरकारसाठी हे मोठे आव्हान होते. 2. रायगडमधील आंदोलन रायगड जिल्ह्यातील महाड येथे नाना पुरोहित आणि मोहन धारिया यांच्या नेतृत्वाखाली टपाल व तारायंत्रांची मोडतोड करण्यात आली. हे पायाभूत संपर्क खंडित करण्याचे महत्त्वाचे काम होते. कर्जत तालुक्यात भाई कोतवाल यांनी गोमाजी पाटील यांच्या मदतीने "आझाद दस्ता" ही आंदोलकांची सशस्त्र फौज स्थापन केली. या फौजेने ब्रिटिशांना थेट सामोरे जाण्याची तयारी केली होती. 3. विदर्भातील आंदोलन विदर्भातील चळवळीचे नेतृत्व मदनलाल बागडी, विनायक दाडेकर आणि शाम नारायण काश्मिरी यांनी केले. त्यांनी "हिंदुस्थान लाल सेना" स्थापन करून आंदोलन केले. नागपूर येथे राष्ट्रीय शिवाजी मंडळाचे कार्यकर्ते दाजीबा महाले आणि त्यांचा केवळ 18 वर्षांचा मुलगा शंकर महाले हुतात्मा झाले. ऑगस्ट 1942 मध्ये आष्टी व चिमूर येथील जनतेस चलेजाव आंदोलनाची चिथावणी दिल्याच्या आरोपावरून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ब्रिटिशांनी अटक केली होती. यानंतर नागपूरच्या जनरल आवारी यांच्या 'लाल सेने'ने आंदोलन तीव्र केले. वर्धा जिल्हा (आष्टी) – 16 ऑगस्ट 1942 रोजी झालेल्या चकमकीत सात आंदोलक ठार झाले. चंद्रपूर जिल्हा (चिमूर) – 16 ऑगस्ट रोजी येथे तीव्र आंदोलन झाले. ब्रिटिश पोलिसांसोबत झालेल्या संघर्षात अनेकांचा बळी गेला. अमरावती (यावली गाव) – 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान येथे सलग आंदोलनाची लाट उसळली. 4. मराठवाड्यातील आंदोलन मराठवाडा त्यावेळी हैदराबाद संस्थान म्हणजेच निझामाच्या अधिपत्याखाली होता, परंतु "चले जाव" आंदोलनाचा प्रभाव तिथेही पोहोचला. आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल अंबाजोगाई (मोमीनाबाद) येथील योगेश्वरी विद्यालयातील 14 शिक्षकांविरुद्ध हैदराबादच्या संरक्षण नियमांखाली प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. नांदेड येथेही 3 ऑक्टोबर 1942 रोजी येथे मोठे आंदोलन झाले, ज्यामुळे हैदराबाद राज्याच्या पोलिसांनी कठोर दडपशाही केली. 5. साताऱ्यातील प्रतिसरकार 1942 च्या चलेजाव चळवळीत साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी एक स्वतंत्र प्रशासन उभारले. याला "पत्री सरकार" किंवा "प्रतिसरकार" म्हटले जात असे. प्रतिसरकारमध्ये यशवंतराव चव्हाण, दिनकरराव निकम, तानाजी पेंढारकर यांसारखे नेते होते. हे प्रतिसरकार तब्बल तीन वर्षे (1942-१९४५) कार्यरत होते. पहिल्या टप्प्यात (1 ऑगस्ट 1942 – 21 मे 1943) मोर्चे, निदर्शने, रेल्वे रूळ उखडणे, तार तोडणे, तिरंगा फडकावणे, प्रभातफेऱ्या अशा अनेक कृती करण्यात आल्या. भूमिगत कार्यकर्त्यांनी कराड, पाटण, तासगाव, खानापूर, वाळवा, खटाव येथील श्रीमंतांकडून पैसा उभारून क्रांतिकार्यासाठी निधी मिळवला. सातारा व सांगली येथे नागनाथअण्णा नायकवडी यांच्या "आझाद दलाने" सशस्त्र संघर्ष केला. याचदरम्यान पुण्यातील "वेस्टएंड" व "कॅपिटल" चित्रपटगृहांत बॉम्बस्फोट घडवले गेले. 1942 मध्ये पुण्यात ब्रिटिश अधिकारी हॅमंड याने गोळीबार करून नारायण दाभाडे यांचा बळी घेतला. 24 ऑगस्ट रोजी व्यंकटेश अंताजी उर्फ मालक-देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली 20 हजारांचा जमाव पाटण तहसील कचेरीवर मोर्चा घेऊन गेला आणि तिरंगा फडकावला. 1946 मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी मालक-देशपांडे यांचा गौरव करताना त्यांना "संयुक्त साताऱ्यातील सच्चा आणि मोठा लढवय्या" म्हटले. तर इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या 'इंडिया आफ्टर गांधी' या ग्रंथात सातारा प्रति सरकारचा उल्लेख 'स्वतंत्र भारतातील लोकशाहीचा पहिला प्रयोग' असा केला आहे. 6. खानदेशातील आंदोलन खानदेशातील चळवळीत साने गुरुजी महत्त्वपूर्ण होते. ते पुण्यातील भूमिगत चळवळीत सहभागी होते. त्यांच्या आदेशाने अंमळनेर येथे डॉ. उत्तमराव पाटील आणि लिलाताई पाटील यांनी नेतृत्व केले. चिमठाणे (धुळे-नंदुरबार रोड) – येथे आंदोलकांनी सरकारी खजिना लुटला. यशवंतराव चव्हाण लग्नाच्या दोन महिन्यांनी तुरुंगात गेले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा देखील 1942 च्या 'भारत छोडो' आंदोलनात सक्रिय सहभाग होता. या काळातच, 2 जून 1942 रोजी, त्यांचे लग्न वेणूताई यांच्याशी झाले. 'लग्न करीन तर देशभक्ताशीच' ही वेणूताईंची अट होती. मात्र, लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच यशवंतरावांना आंदोलनात सहभागी झाल्यामुळे तुरुंगात जावे लागले. केवळ यशवंतरावच नाही, तर वेणूताईंनाही या आंदोलनात सक्रिय असल्यामुळे अटक झाली. लग्नानंतरची पहिली संक्रांत तुरुंगात साजरी करावी लागल्याची खंत यशवंतरावांना आयुष्यभर होती. मात्र, या कठीण परिस्थितीतही वेणूताई डगमगल्या नाहीत आणि त्यांनी मोठ्या धैर्याने परिस्थितीचा सामना केला. चलेजाव चळवळीचे महत्त्व 1942 ची "चले जाव" चळवळ ही केवळ एक आंदोलन नव्हती; ती भारतीय जनतेच्या एकत्रित इच्छाशक्तीचे प्रतीक होती. संपूर्ण भारतभर उठाव झाला. हजारो लोक तुरुंगात गेले, शेकडो शहीद झाले, पण या चळवळीमुळे ब्रिटिश सत्तेला हादरा बसला. ब्रिटिशांनी या चळवळीवर प्रचंड दडपशाही आणली. नेत्यांना अटक, जमावावर गोळीबार, संस्थांची जप्ती. तरीही आंदोलनाची ज्वाला शमत नव्हती. भूमिगत कार्यकर्ते, गुप्त रेडिओ, सशस्त्र पथके आणि जनता या सर्वांनी मिळून ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला. 1942 च्या या लढ्याने स्वातंत्र्यलढ्याला अंतिम टप्प्यात नेले. या चळवळीमुळे आता आपले भारतात मोजकेज दिवस शिल्लक राहिलेत असा स्पष्ट ब्रिटिशांना मिळाला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/rWYoaK3
हिंमत असेल तर माझ्यावर गोळी चालवा:ब्रिटिशांना ललकारणारा ‘बालवीर’शिरीषकुमार मेहता, 16 व्या वर्षी देशासाठी दिले बलिदान
August 14, 2025
0