Type Here to Get Search Results !

पुण्यात रेल्वे स्टेशन मास्टर्सचे आंदोलन:एसी, फर्निचर, पिण्याचे पाणी आणि रिक्त पदांसह १९ मागण्यांचे स्मरणपत्र सादर

ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशन (आस्मा) पुणे मंडळाच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. पुणे रेल्वे मंडळातील शेकडो स्टेशन मास्टर्स, सहाय्यक कर्मचारी व संबंधित पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. आंदोलनानंतर मंडळ रेल्वे व्यवस्थापकांना १९ प्रमुख मागण्यांचे सविस्तर स्मरणपत्र देण्यात आले. या आंदोलनात आस्माचे माजी राष्ट्रीय महामंत्री धनंजय चंद्रात्रय, मंडल सचिव पुरुषुत्तम सिंग, मंडल अध्यक्ष कृष्ण मुरारी, तसेच स्टेशन मास्टर अजय सिन्हा, अमित कुमार, गंगाधर शाहू, अर्जुन कुमार, शकील इनामदार, दिनेश कांबळे, गोपाल कुमार यांसह पुणे मंडळातील एकूण १३० स्टेशन मास्टर्स उपस्थित होते. या मागण्यांमध्ये स्टेशन मास्टर्सच्या कार्यकक्षात वातानुकूलन (एसी) आणि आरामदायी फर्निचरची सोय, सर्व स्टेशनवर शुद्ध पिण्याचे पाणी, रिक्त पदांची तातडीने भरती, संवेदनशील स्टेशनवर दुसऱ्या स्टेशन मास्टरची नेमणूक, महिलांसाठी स्वतंत्र बदलण्याची खोली व शौचालय, योग्य ड्युटी रोस्टर, पदोन्नती व बदली धोरणातील सुधारणा, तसेच सुरक्षिततेसाठी आवश्यक तांत्रिक बदलांचा समावेश आहे. संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, उष्णतेमुळे आणि उपकरणांच्या उष्णतेमुळे अनेक स्टेशन मास्टर्सना आरोग्य समस्या भेडसावत आहेत. योग्य खुर्च्या नसल्याने पाठीच्या व मानेच्या तक्रारी वाढल्या असून, याचा थेट परिणाम त्यांच्या कार्यक्षमता व एकूणच रेल्वेच्या सुरक्षिततेवर होत आहे. रिक्त पदांमुळे ड्युटीचे ओझे असह्य झाले आहे, तसेच अनेकांना आठवड्याचा निश्चित सुट्टीचा दिवस मिळत नाही. महिलांना कार्यकाळात सुरक्षित व सोयीस्कर सुविधा उपलब्ध नसल्याची खंतही नेत्यांनी व्यक्त केली. तांत्रिक बाबींच्या संदर्भात, डाटा लॉगर सिस्टीममधील विलंब दूर करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर बदल, तसेच स्टेशन मास्टर्सना वेळेवर ओव्हरटाईम भत्ता देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, स्थानकांच्या समोर पावसापासून व उन्हापासून संरक्षणासाठी शेड उभारणे, स्टेशन परिसरातील सुरक्षाविषयक प्रोटोकॉल काटेकोरपणे पाळणे, आणि इतर विभागांकडून होणाऱ्या अनधिकृत हस्तक्षेपावर मर्यादा आणणे यांसारख्या मुद्द्यांनाही महत्त्व देण्यात आले. संघटनेने सांगितले की, या सर्व मागण्या तातडीने पूर्ण झाल्यास कर्मचारी मनोबल वाढेल, रेल्वे सेवा अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम होईल, तसेच प्रवासी सेवांची गुणवत्ता सुधरेल. त्यांनी इशारा दिला की, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.हे आंदोलन पुणे मंडळातील स्टेशन मास्टर्सच्या एकतेचे प्रतीक ठरले. अनेक स्टेशनवरून आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या समस्या उघडपणे मांडल्या. संघटनेच्या बॅनरखाली झालेल्या या लढ्यात, सर्व मागण्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी घोषणाबाजी व शांततापूर्ण मार्गाने निदर्शन करण्यात आले. रेल्वे व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/Nm8IheO

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.