विधीमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती १९ ते २१ ऑगस्टदरम्यान अमरावती जिल्ह्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात आदिवासींच्या हक्कांची स्थिती आणि विविध कार्यालयांमधील एसटी संवर्गातील कर्मचाऱ्यांची वास्तविक परिस्थिती तपासली जाणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या दौऱ्याच्या नियोजनासाठी विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार मागासवर्गीय कक्षाच्या कामकाजाची अद्ययावत माहिती ठेवण्यात येणार आहे. आश्रमशाळा आणि वसतिगृहांना भेटी देण्यात येणार असल्याने तेथील समस्यांचे निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. ॲट्रॉसिटी प्रकरणांची सद्यस्थिती, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित जात प्रमाणपत्र यांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पेसा क्षेत्रात अनुसूचित जमाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या भरतीची खातरजमा करण्यात येणार आहे. पोलिस, महावितरण, एसटी महामंडळ आणि विद्यापीठातील अधिसंख्य पदांची माहिती आणि शिक्षकांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/53nkLiW
19 ते 21 ऑगस्टला अमरावतीत विधीमंडळाच्या एसटी समितीचा जिल्हा दौरा:जिल्हाधिकाऱ्यांकडून नियोजनाचा आढावा
August 12, 2025
0