शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे लोकशाहीच्या रक्षणाची कळकळीची विनंती केली. सध्याचे सरन्यायाधीश कर्तव्यदक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी लोकशाही वाचवली पाहिजे, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, गेली तीन-चार वर्षे लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर तडफडत आहे. तिला न्यायाचं पाणी पाजावं, अन्यथा ती दम तोडेल, असा भावनिक इशाराही त्यांनी दिला. हे वक्तव्य त्यांनी मार्मिकच्या ६५व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे आणि त्यावर लवकरच अंतिम सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यामुळे ठाकरे गटाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि त्यामुळेच लोकशाही वाचेल, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी न्यायव्यवस्थेकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली. उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीमध्ये न्यायालयाने सांगितलं की रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना पकडा. मग कुणीतली म्हटलं की कुत्र्यांना पकडलं तर झाडावरील माकडं रस्त्यावर येतील. पण अशी माकडं संसदेत पोहोचली आहेत. आपले सरन्यायाधीश यांनी दिल्लीतील या भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं सांगितलं आहे. ते कर्तव्यदक्ष सरन्यायाधीश आहेत, त्यामुळे त्यांचे आभार. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, याच सरन्यायाधीशांना मी विनंती करतोय की, आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर आपली लोकशाही तडफडत आहे. तीन वर्षे झाली, चार वर्षे झाली, ती कधी प्राण सोडेल सांगता येत नाही. तुम्ही आता चौथे सरन्यायाधीश, त्या लोकशाहीच्या तोंडात जर का न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातील लोकशाही मरेल. त्यामुळे खंडपीठ कोणतंही असलं तरी तुम्ही त्यामध्ये लक्ष घाला अशी मी हात जोडून विनंती करतो. मुंबई महाराष्ट्राला मिळाली म्हणण्यापेक्षा ती मराठी माणसाने मिळवली. आजही मुंबईचा लचका तोडता येईल का याचा प्रयत्न मध्ये मध्ये चोची मारून केला जातो. मग तो हिंदी सक्तीचा विषय असेल किंवा मुंबईचं महत्व मारण्याचं निमित्त असेल, हे प्रयत्न काही थांबले नाहीत. असे प्रयत्न करणाऱ्याला आपण जोपर्यंत संपवत नाही तोपर्यंत मार्मिक आणि शिवसेनेचे काम काही थांबणार नाही.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/QMe9EFX
लोकशाही न्यायाच्या उंबरठ्यावर तडफडतेय, तिला वाचवा:उद्धव ठाकरे यांचे सरन्यायाधीशांना आवाहन; न्यायव्यवस्थेकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
August 13, 2025
0