मंगळवेढा येथे समर्थ संप्रदायातील सद्गुरूंच्या बैठकीसाठी निघालेल्या सासू-सुनेचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रेणुका विजय तासगावकर (३८) आणि शालिनी पांडुरंग तासगावकर (६०, रा. धर्मगाव रोड, दुर्गामाता मंदिर, मंगळवेढा) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी विजय तासगावकर यांनी फिर्याद दिल्यानंतर ट्रकच्या चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी सकाळी ७:३० च्या सुमारास रेणुका आणि शालिनी घरातून सद्गुरूंच्या बैठकीसाठी निघाल्या. रेणुका स्कूटी चालवत होत्या. दोघी सकाळी ७:४५ वाजता विजापूर-पंढरपूर बायपास रस्त्यावर दामाजी कारखाना चौकजवळील नेने मळा येथे आल्या. तेथे क्लचची वायर तुटल्यामुळे एक नादुरुस्त ट्रक (एचआर ३८ एसी ३६७२) थांबला होता. त्याला पाठीमागून कांद्याने भरलेल्या दुसऱ्या एका ट्रकने (केए ०१ ए ६२९१) आधी जोरदार धडक दिली. नंतर तो बैठकीसाठी निघालेल्या सासू-सुनांच्या स्कूटीवर कोसळला. त्यात चिरडल्याने दोघीही जागीच ठार झाल्या. कांद्याच्या ट्रकखाली अडकल्या सासू अन् सून ट्रक उलटल्यानंतर ट्रकच्या खाली दोघीही स्कूटीसह अडकल्या. ट्रकमध्ये कांदा भरलेला असल्यामुळे क्रेनच्या साहाय्याने तो उभा करण्यात आला. या वेळी कांदा बाजूला करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केले. दोघींच्या मृतदेहाचे मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मंगळवेढा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते. समृद्धीवर ट्रक धडकला, चालक ठार कारंजा | समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकवर भरधाव ट्रक धडकल्याने चालक ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. रामदास सुभाष साळवे (३२, रा. दर्याबाई पाडळी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे मृताचे नाव आहे. समृद्धी महामार्गावरील पोहा गावाजवळच्या नागपूर कॉरिडॉर चॅनल नंबर १८८ येथे संबंधित ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे ट्रकचालक रामदास सुभाष साळवे केबिनमध्ये अडकून जागीच ठार झाला. अपघाताची माहिती पोहा येथील शेतकऱ्यांनी गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना देताच त्यांनी घटनेबाबत समृद्धी महामार्ग १०८ लोकेशन कारंजा यांना फोनद्वारे माहिती देऊन घटनास्थळी पाचारण केले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/P4uDoVf
सद्गुरूंच्या बैठकीला जाताना सासू-सुनेच्या स्कूटीवर ट्रक उलटल्याने मृत्यू:विजापूर-पंढरपूर बायपास रस्त्यावर नेने मळा येथे विचित्र अपघात
August 03, 2025
0