राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या (एनएचएम) कर्मचाऱ्यांचा कायम नोकरीच्या मागणीसाठी सुरू असलेला संप आठवड्यानंतरही कायम आहे. सोमवारी सकाळी संपकर्त्यांनी जिल्हा परिषदेपासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मोर्चादरम्यान जिल्हा परिषदेच्या सीइओ, जिल्हाधिकारी आणि खासदारांना निवेदन देण्यात आले. 'आयटक'शी संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी-कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. अशोक कोठारी, डॉ. अंकुश मानकर, प्रीती पवार आणि मोनाली खांडेकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून शासनाला कळवण्याचे आश्वासन दिले आहे. संघटनेचे काही नेते मुंबईत दाखल झाले असून सरकारसोबत सकारात्मक वाटाघाटी होण्याची अपेक्षा आहे. आयटकचे पदाधिकारी दिलीप उटाणे यांनी एक-दोन दिवसांत तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सरकारने दहा वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अंमलबजावणी न झाल्याने हे आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील २०० डॉक्टर, ६०० परिचारिका, फार्मासिस्ट, समुपदेशक, वॉर्ड बॉय यांसह दीड हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/qhm71OL
एनएचएमच्या कर्मचाऱ्यांचा संप कायम:अमरावतीत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; मुंबईत वाटाघाटी सुरू
August 25, 2025
0