अमरावती येथील अष्टविनायक गणपती महोत्सव समितीतर्फे यावर्षीच्या गणेशोत्सवात श्री गणेश दर्शनासह ‘छावा’ या ऐतिहासिक नाटकाचे सादरीकरणही केले जाणार आहे. समितीचे अध्यक्ष नानासाहेब बोके यांनी आज, सोमवारी ही माहिती माध्यमांसमोर मांडली.गणेशोत्सवादरम्यान २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या काळात दररोज सायंकाळी ६ वाजता ‘छावा’ चा प्रयोग होणार आहे. त्यासाठी शहराचे मध्यवर्ती सभागृह असलेले सांस्कृतिक भवन आरक्षित करण्यात आले असून अमरावतीकरांना गणेशोत्सवासोबतच राजे छत्रपती संभाजी यांचा जाज्वल इतिहासही बघायला-ऐकायला मिळणार आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले ‘छावा’ हे नाटक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून शिवशंभूशाहीर महेंद्रराजे महाडीक (पुणे) यांची ती निर्मिती आहे. या नाटकात सुमारे ७५ कलावंत असून त्यासाठी सांस्कृतिक भवनाच्या मंचात योग्य तो बदलही करण्यात आला आहे. या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अचलपुरचे आमदार प्रवीण तायडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन गांग (जैन) प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी बोके यांच्याशिवाय समितीचे संयोजक नितीन पवित्रकार, सोपान गुडधे, अतुल गोळे, निमंत्रक जीवन सदार व सुरेखा लुंगारे, सहकोषाध्यक्ष प्रा. जगदीश गोवर्धन, युवा प्रतिनिधी डॉ. प्रशांत विघे आदी मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक भवनात रंगमंचसदर नाटकासाठी सांस्कृतिक भवनाच्या आत भव्य रंगमंच साकारण्यात येत आहे. मराठे व मोगल यांच्या तलवारींचा खणखणाट, तोफांचा गडगडाट, अग्नीवर्षावात घनघोर रणसंग्राम, डोळे दीपविणारी विद्युत रोषणाई, राज्याभिषेक, १२ फूट उंच जहाजाचा वापर, किल्ले जंजीरा मोहीम आणि खटकेबाज संवाद असे सर्व प्रसंग त्याठिकाणी सादर केले जाणार आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/S0rQtyU
अमरावतीत गणेशोत्सवात नाट्यमेजवानी:अष्टविनायक मंडळातर्फे 'छावा' नाटकाचे सादरीकरण; 75 कलावंत सहभागी
August 25, 2025
0