Type Here to Get Search Results !

एनसीएलमधून चंदनाची झाडे चोरणारे दोघे ताब्यात:दोन साथीदार पळाले; दौंड तालुक्यातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

सुरक्षा दृष्टीने मजबूत असलेल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) आवारात शिरलेल्या आणि चंदनाची सात झाडे कापून नेणाऱ्या चोरट्यांना सुरक्षारक्षकांनी पकडले आहे. चोरट्यांबरोबर असलेले दोन साथीदार संधीचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. या प्रकरणी बाबू ताया लोखंडे (वय ४९, रा. केडगाव, ता. दौंड), सुरेश पाटोळे (वय २८, रा. खुटबाव, चाळोबा वस्ती, ता.दौंड) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत पराग रमेश चिटनवीस (वय ५६, रा. एनसीएल कॉलनी, पाषाण रस्ता) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडे, पाटोळे आणि साथीदार हे २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या आवारात शिरले. चोरट्यांनी चंदनाच्या सात झाडांचा बुंधा कटरने कापून नेला. रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या सुरक्षारक्षकांनी चंदन चोरटे लोखंडे, पाटोळे आणि साथीदारांना पाहिले. सुरक्षारक्षकांनी लोखंडे आणि पाटोळे यांना पकडले. त्यांच्याबरोबर असलेले दोन साथीदार अंधारात भिंतीवरून उडी मारून तातडीने पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुणे शहरातील शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, बंगले, सोसायटीच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी एनसीएल, राजभवन, पुणे विद्यापीठाच्या आवारातूनही चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. चंदनाच्या झाडांचे बुंधे यांत्रिक करवतीचा किंवा कटरचा वापर करून कापले जातात. मध्यरात्री पाहणी करून चोरटे चंदनाची झाडे कापून नेतात. चंदनाचा वापर सुवासिक तेल, अत्तरे तयार करण्यासाठी केला जातो. काळ्या बाजारात चंदनाच्या झाडांना मोठी किंमत मोजली जाते. पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड तालुक्यातील चोरट्यांच्या टोळ्या चंदनाची झाडे कापून नेण्यात तरबेज आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/EwYHXuh

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.