गणपती बाप्पाचे आगमन झाले आणि सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले. गणपती बाप्पा हा जसा बुद्धीचा देवता मानला जातो तसाच तो कलेचाही देवता आहे. 14 विद्या तसेच 64 कला या गणपतीला अवगत असल्याचे बोलले जाते. गणपतीच्या विविध रूपातील आपण मूर्ती पाहिली असेल, कधी वीणा घेऊन, कधी डमरू घेऊन तर कधी तबला किंवा मृदुंग असे विविध वाद्यांसोबत गणपती बाप्पाला दाखवले जाते. याच गोष्टी लक्षात ठेवत दिव्य मराठी डिजिटलने गणेशोत्सवाच्या काळात आपल्यासाठी खास कलाकारांची मेजवानी आणली आहे. 'कलाधीश' या वृत्त मालिकेतून आपण रोज एका कलाकाराची ओळख करून घेणार आहोत तसेच त्यांच्याशी गप्पाही मारणार आहोत. आजच्या कलाधीशच्या भागात आपण एका अशा कलाकाराविषयी जाणून घेणार आहोत की जिची ढोलकीवर थाप पडताच ऐकणारे रसिक अगदी मंत्रमुग्ध होऊन जातात. होय, तुम्ही बरोबर वाचले आहे, जिची ढोलकीवर थाप पडताच रसिक मंत्रमुग्ध होतात, ही आहे एक युवा कलावंतीण. जिचे नाव आहे वैष्णवी गित्ते. अगदी लहान वयापासूनच वैष्णवीला कलेची आवड होती. तिच्याशी गप्पा मारताना तिने एक किस्सा सांगितला, तो किस्सा असा की जेव्हा ती एका संगीताच्या क्लासला गेली तेव्हा तिथे अनेक वाद्य होते, तेव्हा तिथल्या गुरुजींनी वैष्णवीला विचारले की तुला काय शिकायचे? कुठल्याही वाद्याची ओळख नसताना वैष्णवीने समोर असलेल्या तबल्याकडे बोट दाखवत म्हटले मला हे शिकायचे. वाद्यांची ओळख नसतानाही तिने तबल्याकडे बोट दाखवत आपली पुढील वाटचाल ठरवली होती. आता प्रश्न पडला असेल की तबला शिकत होती तर मग ढोलकी कुठून आली? याचाही असाच एक मजेदार किस्सा आहे. ढोलकी कधीच वाजवलेली नसताना थेट स्टेजवर तबला शिकत असताना अचानक ढोलकीकडे कसे काय वळली याविषयी वैष्णवीने उत्तर देताना म्हटले, एकदा शाळेत सहावीत असताना आमची गॅदरिंग होती, तेव्हा ढोलकी कोणी वाजवू शकते का? असे विचारण्यात आले. तेव्हा चटकन हो, मी वाजवू शकते असे तिने सांगितले. गमतीचा भाग असा की तेव्हा वैष्णवीने त्याआधी ढोलकी कधीही वाजवली नव्हती. मग काय, तिने मित्राची ढोलकी घेतली आणि थेट स्टेजवर जाऊन पोहोचली. यातूनच तिच्यात असलेला आत्मविश्वास आणि तालातील बोलांची ओळख अगदी ठासून भरलेली दिसते. टाळ अन् ढोलकीचा आवाज ऐकताच निघून जाणारे प्रेक्षक माघारी फिरले वैष्णवीला तिच्या घरून देखील तिच्या या संगीतातील प्रवासाला पाठिंबा मिळाला तसेच वेळोवेळी प्रोत्साहन देत तिला नवनवीन कार्यक्रमांमध्ये तसेच विविध मंचांवर जाण्यास कधीही रोखले नाही. वैष्णवीने स्थानिक कार्यक्रम तर केलेच आहेत, पण त्याचसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ढोलकीने रसिकांची मने जिंकली आहेत. याबद्दल एक किस्सा वैष्णवीने सांगितला की, बंगळुरू येथे एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात वैष्णवी व तिच्या टीमचे देखील सादरीकरण ठेवण्यात आले होते. मात्र, काही वेळाने उपस्थित प्रेक्षक हळूहळू निघून जायला लागले आणि नेमके तेव्हाच वैष्णवी आणि तिच्या टीमचे सादरीकरण होणार होते. प्रेक्षक निघून जात आहेत तरी जाऊदे जेवढे आहेत आपण त्यांच्यासाठी तरी सादरीकरण करू असे त्यांनी ठरवले. त्यानंतर एक जादुच झाली. जसे इकडे एकतारा, टाळ आणि ढोलकीचा आवाज सुरू झाला तसे निघून जाणाऱ्या प्रेक्षकांचे पाय वळले आणि पुन्हा कार्यक्रम पाहण्यास माघारी फिरले. प्रेक्षक निघून जात असल्याने गर्दी झाली होती म्हणून अनेक लोक त्यांच्या पायाच्या अंगठ्यांवर उभे राहत डोकावून पाहण्यास सुरू केले होते. वैष्णवी गित्तेला 'झी युवा' या चॅनलवरील संगीतसम्राट या कार्यक्रमात देखील जाण्याची संधी मिळाली होती. याबद्दल सांगताना वैष्णवीने सांगितले की, हा एक फार वेगळा अनुभाव होता. खूप काही शिकायला मिळाले. त्यावेळी या कार्यक्रमाचे जज होते गायक राहुल देशपांडे आणि आदर्श शिंदे, या दोन्ही नेत्यांकडून खूप चांगले मार्गदर्शन मिळाले असल्याचे तिने सांगितले. विशेष म्हणजे अगदी 11 वी मध्ये असताना वैष्णवीला टीव्हीवर जाण्याचा चान्स मिळाला होता आणि तेही तिच्या कलेच्या जोरावर आणि ढोलकीच्या बोलावर. ढोलकीच्या परीक्षा असतात का? शास्त्रीय संगीत म्हटले की त्याच्या परीक्षा आल्या. वैष्णवीने तबल्याच्या मध्यमा प्रथमपर्यंतच्या परीक्षा अगदी चांगल्या गुणांनी पास केल्या आहेत. तसेच ढोलकीच्या परीक्षा असतात का? असा प्रश्न विचारला असता त्यावर वैष्णवीने माहिती दिली की ढोलकीच्या परीक्षा नसतात. शास्त्रीय संगीतातील जी वाद्य आहेत त्यांच्या परीक्षा असतात, पण जी लोकसंगीतात वापरली जाणारी वाद्य असतात (हार्मोनियम, मृदुंग व तबला वगळता) त्यांच्या शक्यतो परीक्षा नसतात. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून तबल्याच्या परीक्षा घेतल्या जात असल्याची माहिती वैष्णवीने दिली. या गुरूंचे लाभले मार्गदर्शन आपल्या भारतीय संस्कृतीत गुरांना फार महत्त्व आहे. गुरुच असतो जो आपल्याला शिकवतो, घडवतो आणि तसेच योग्य दिशा दाखवण्याचे कामही गुरुच करतो. संगीतात देखील आजही पूर्वीप्रमाणेच गुरु-शिष्य परंपरा कायम आहे. एखादे वाद्य शिकायचे म्हटले किंवा गाणं जरी शिकायचे म्हटले तर समोर गुरु पाहिजे. संगीत ही गुरुमुखी विद्या म्हटले गेले आहे. त्यानुसारच वैष्णवीला देखील तिच्या संगीताच्या प्रवासात अनेक गुरु लाभले आहेत. तबलावादक पं. सुधीर बहिरगावकर यांच्याकडून वैष्णवीने तबल्याचे धडे शिकले. त्यानंतर ढोलकीसाठी स्व. ढोलकी सम्राट दत्ताभाऊ घोटकर यांच्याकडून ढोलकी शिकली. तसेच अजिंक्य लिंगायत यांच्याकडूनही ढोलकी शिकायला मिळाली. सध्या प्रो. शोन पाटील यांच्याकडे तबल्यातील पुढील शिक्षण घेत आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/PHKrYO6
कलाधीश: ढोलकीवरची थाप... आणि रसिक मंत्रमुग्ध!:तबल्याकडे बोट दाखवत केली सुरुवात, युवा कलावंतीण वैष्णवी गित्तेचा सांगीतिक प्रवास
August 31, 2025
0