Type Here to Get Search Results !

गाेदेला महापूर; 1219 गावांना धाेका:जायकवाडीचे 27 दरवाजे उघडून इतिहासात प्रथमच रात्री 12 वाजता 3.6 लाख क्युसेक विसर्ग

जायकवाडी धरणाच्या निर्मितीनंतर तसेच २००६ नंतर प्रथमच रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे १० फूट उघडून ३ लाख ६ हजार ५४० क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नदीपात्राची क्षमता १ लाख क्युसेकची असल्याने गोदेला महापूर आला. खबरदारीचा उपाय म्हणून पैठण शहरातील १५०० व तालुक्यातील नदीकाठावरील वडवाळी, नायगाव, आपेगाव, कुरणपिंप्री, हिरडपुरी, नवगाव आदी १० गावांतील २ हजार २५७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे, असे तहसीलदार ज्योती पवार यांनी सांगितले. यापूर्वी २००६ मध्ये २ लाख ५६ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. तेव्हाही पैठणमध्ये पुराचे पाणी शिरले होते. शनिवारी मध्यरात्री, रविवारी पहाटे छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्याला तुफानी पावसाने झोडपले. जिल्ह्यातील ८४ पैकी ६८ मंडळांत अतिवृष्टी झाली. संभाजीनगर शहरात रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ९८.६, तर जिल्ह्यात याच काळात ११०.८ मिमी पाऊस झाला. २९ सप्टेंबर रोजीचा ऑरेंज अलर्ट लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संभाजीनगरच्या ग्रामीण भागात शाळा, कॉलेजला सुटी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संभाजीनगरसह मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसान तसेच मदतकार्याचा आढावा घेतला. हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गला २९ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट दिला. मुंबई, ठाण्यासह पालघरला रेड, तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत आजही पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पैठण शहरातील १५००, जालना जिल्ह्यात १० हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवले गोदावरी नदीच्या पात्राजवळ सहा प्रमुख जिल्ह्यांची शहरे आहेत. महापुरामुळे या शहरांना जोडणारे ४५० महत्त्वाचे छोटे-मोठे रस्ते पाण्यात बुडून बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कायगाव, पैठण, शहागड (गेवराई-बीड), लोणी (परतूर- जालना), ढालेगाव (माजलगाव- पाथरी), गंगाखेड (परभणी- गंगाखेड), नांदेड-लातूर पूल पुराच्या पाण्यात बुडू शकतात. छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, बीड जालना, हिंगोलीत पावसाचे थैमान गोदावरीचे पाणी नांदेडच्या ३३७, बीड ३०६, जालना १७७, परभणी २८६, हिंगोली ७०, छत्रपती संभाजीनगरातील ४३ गावांमध्ये शिरून मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. मराठवाड्यातील ७ पूल पाण्यात जाऊ शकतात मुळशीतील (जि.पुणे) ताम्हिणी घाटात यंदा ९,००० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. यामुळे ते भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण बनले आहे. ताम्हिणीने ईशान्येच्या मेघालयातील चेरापुंजी आणि मावसिनराम गावांना मागे टाकले आहे. ताम्हिणी घाटात ९,१९४ मिमी पाऊस पडल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/eXvqYHk

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.