परतीच्या पावसाने संपूर्ण सातारा जिल्ह्याला झोडपून काढले असून, कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटाने उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुष्काळी माण तालुक्यातील माणगंगा नदीला पूर आल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक बंद आहे. म्हसवड शहरात पावसाचे पाणी साचले असून, दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील १३ महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणात प्रति सेकंद १२,५४५ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले असतानाच आवक वाढल्याने पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शनिवारी दुपारी धरणाचे सहा वक्र दरवाजे २ फुटाने उघडण्यात आले आहेत. धरणाच्या सांडव्यावरून १८,७६४ आणि पायथा विद्युतगृहाच्या दोन्ही युनिटमधून २१००, असा एकूण २०,७६४ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. १३ महसूल मंडळात अतिवृष्टी सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला आहे. निमसोड (66.8 मि. मी.), कलेढोण (66.8 मि. मी.), म्हसवड (85.8 मि. मी.), मार्डी (68.3 मि. मी.), शिंगणापूर (68.3 मि. मी.), वाठार-फलटण (77.3 मि. मी.), पाचवड (68.0 33 मि. मी.), महाबळेश्वर (66.0 मि. मी.) या १३ महसूल मंडलामध्ये अतिवृष्टी झाली आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला माण तालुक्यातील म्हसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवापूर-शिरताव, पुळकोटी-गंगोती, पळसावडे-देवापूर, ढाकणी-ढाकणी फाटा, बनगरवाडी-वरकुटे मलवडी, काळचौंडी-झरे, महाबळेश्वरवाडी-काळचौंडी या गावांना जोडणारे पूल, साकव पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, आंबवडे -गोरेगांव (निम.) निमसोड ता. खटाव रस्त्याच्या पुलावरुन सुरेश रघूनाथ गायकवाड रा. आंबवडे हे येरळा नदीपत्रात वाहून गेले आहेत म्हसवड शहर जलमय, व्यापाऱ्यांचे नुकसान पावसाचे पाणी साचल्याने म्हसवड शहर जलमय झाले असून बसस्थानकाच्या समोरील ढालेमामा कॉम्पलेक्सच्या दुकान गाळ्यांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात्रा पटांगणावरील सर्कशीच्या तंबूत पाणी शिरल्याने सर्कशीला मोठा फटका बसला आहे. म्हसवडच्या मुख्य रस्त्यांवर सध्या गुडघाभर पाणी पाहायला मिळत आहे. आहे. प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसिलदार सचिन अहिरे आणि मुख्याधिकारी डॉ. सचिन माने हे पाऊस आणि पुराचा आढावा घेत आहेत. तसेच पालिकेने आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात ठेवली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/iq5lNJE
सातारा जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले:माण तालुक्यात पुराचे थैमान, म्हसवड शहर जलमय; 13 मंडळांत अतिवृष्टी
September 27, 2025
0