मुंबईतील मुंबादेवी मंदिराच्या गाभाऱ्यात सध्या जे दृश्य आहे ते शब्दात मांडणे कठीण आहे. या मंदिराच्या परिसरात श्री जगदंबा, श्री अन्नपूर्णा आणि श्री हनुमानाचे मंदिर आहे. देवी मुंबाबाईंचा श्रृंगार इतका मनमोहक आणि अलौकिक आहे की प्रत्येक भक्त डोळे भरून या रूपाचे दर्शन घेत आहे. मातेच्या मुखावर सोन्याचा तेजस्वी मुखवटा आहे, त्यावर लाल शेंदराचा टिळा आणि बोलके डोळे पाहून मन शांत होते. त्यांच्या शिरपेचावर एक भव्य सुवर्ण मुकुट शोभून दिसतोय, ज्यावर छत्री विराजमान आहे. गळ्यात फुलांच्या माळा आहेत, ज्यात हिरव्या, पांढऱ्या, नारंगी आणि लाल फुलांची आकर्षक रचना आहे. या माळांच्या मध्यभागी सोन्याचा सिंहमुख आहे, जो सिंहवाहिनी दुर्गेचे प्रतीक आहे. या सिंहमुखाच्या वर एक मोठी आणि तळपणारी तलवार ठेवलेली आहे, जी मातेच्या सामर्थ्याची व पराक्रमाची साक्ष देते. मातेचे संपूर्ण रूप ताज्या आणि रंगीबेरंगी फुलांनी सजलेले आहे. झेंडू, गुलाब आणि मोगऱ्याच्या सुगंधाने संपूर्ण गाभारा दरवळला आहे. मातेच्या डोक्याभोवती फुलांचे मोठे प्रभामंडळ तयार केले आहे. मातेने हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. मातेच्या मूर्तीखाली चांदी आणि पितळाचे कलश, मिठाई आणि प्रसाद ठेवलेला आहे. पार्श्वभूमीला देवी-देवतांच्या कलाकृती आहेत, ज्या या पवित्र वातावरणाला अधिक दैवी स्वरूप देत आहेत. खऱ्या अर्थाने मातेचा हा भव्य श्रृंगार त्यांच्या दिव्यत्वाचे आणि शक्तीचे प्रतीक आहे. मुंबादेवी मंदिर परिसरातील पहाटेचा अनुभव व भाविकांच्या भावना : मरिन लाइन्स स्थानकावर पहाटे ४ वाजेच्या सुमारास छोट्या छोट्या समूहात, कुटुंबासोबत, नवविवाहित जोडपी पायी मुंबादेवी मंदिराच्या दिशेने जाताना दिसत आहेत. याचे कारण म्हणजे नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे पहाटे ५:३० वाजता मंगल आरतीनंतर उघडले जातात. या पहिल्या आरती सहभागी होण्यासोबत मातेच्या दर्शनासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने येथे पोहोचतात. सध्या मुंबादेवी मंदिर परिसरात २१ विशेष पुजारी अखंड चंडीपाठ करत आहेत, जो संपूर्ण नवरात्रभर सुरू राहील. दरम्यान, दर्शनरांगेत भाविकांकडून “मुंबादेवी माई की जय’ असा जयघोष सतत ऐकू येत आहे. मुंबादेवीवर श्रद्धा असलेल्या सुनंदा पाटील कुटुंबासोबत दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांनी सांगितले की, “माझ्या लग्नाला जवळपास ३० वर्षांहून अधिक काळ झाला आहे आणि मी लग्नाआधीपासूनच दर नवरात्रीला दर्शनासाठी येते. मुंबादेवीच्या आशीर्वादामुळेच मला चांगला पती आणि सुखी कुटुंब मिळाले आहे.” दर्शन गायकवाड, वाराणसीहून आलेले राकेश सिंह या भक्तांचीही अशीच नवसपूर्तीची कहाणी आणि देवीवरील श्रद्धा आहे. मुंबादेवीची वास्तुकला, उत्पत्ती, इतिहास आणि वाहनांची माहिती मुंबादेवी मंदिराचे पुजारी संदीप भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात देवीची काळ्या पाषाणातील नक्षीदार मूर्ती आहे. ती चांदीचा मुकुट, नथ, हारांनी सजवलेली आहे. देवीच्या वाहनांविषयी मुंबादेवीचे वाहन ठरलेले नाही. देवीच्या इच्छेनुसार आणि वारानुसार तिचे वाहन दररोज बदलते. ही सर्व वाहने चांदीची आहेत. दिवसानुसार वाहनांचा क्रम : रविवारी ः सिंह, सोमवार : नंदी, मंगळवार : हत्ती, बुधवार : कोंबडा, गुरुवार : गरुड, शुक्रवार : हंस, शनिवार : हत्ती. मुंबादेवीची उत्पत्ती आणि मुंबई शहराचे नाव आख्यायिकेनुसार, फार पूर्वी या भागात मुंबारका नावाचा राक्षस लोकांचा छळ करत होता. ब्रह्मदेवाने अष्टभुजाधारी अंबा देवीला त्याचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर पाठवले. देवी आणि मुंबारका यांच्यात युद्ध झाले. मुंबारका देवीला शरण गेला आणि त्याने आपले नाव धारण करण्याची विनंती केली. देवीने त्याची विनंती मान्य केली आणि ती त्याच ठिकाणी विराजमान झाली. मुंबारकाला हरवल्यामुळे देवी अंबा यांना ‘मुंबा’ हे नाव मिळाले. असेही मानले जाते की मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या कोळी समाजाने समुद्रातील संकटातून वाचण्यासाठी देवीला हाक दिली होती. देवीने त्यांचे रक्षण केले, म्हणून त्यांनी देवीला प्रेमाने ‘आई’ असे संबोधायला सुरुवात केली. अशा प्रकारे, ‘मुंबा’ आणि ‘आई’ या शब्दांपासून या शहराला ‘मुंबई’ हे नाव मिळाले. मंदिराचा २८८ वर्षांचा इतिहास श्री मुंबादेवी मंदिर चॅरिटीजचे व्यवस्थापक हेमंत जाधव सांगतात की, मंदिराचे मूळ बांधकाम १६७५ च्या सुमारास बोरीबंदर येथे झाले होते. त्यानंतर १७३७ मध्ये हे मंदिर भुलेश्वरमधील झवेरी बाजार येथे पुन्हा उभारण्यात आले. २०२५ पर्यंत या मंदिराला २८८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/3Snbo9L
दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:मुंबादेवी... जिच्या नावाने ओळखली जाते मुंबई, इच्छापूर्ती करणाऱ्या मुंबादेवीवर भक्तांची श्रद्धा, नवरात्रात अखंड चंडीपाठ
September 26, 2025
0