ठाणे आणि मुंबईकरांच्या प्रवासाला लवकरच गती मिळणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या मेट्रो ४ (वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली-गायमुख) आणि मेट्रो ४ अ मार्गाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी सुरू झाली आहे. या प्रकल्पामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुती सरकारला राजकीय फायदा होण्याची शक्यता असून याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये या प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरून जुगलबंदी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री म्हणाले, “जवळपास ३५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर दररोज सुमारे १३.४३ लाख प्रवासी प्रवास करू शकतील. यामुळे प्रवासाचा वेळ ५० ते ७५ टक्क्यांनी कमी होईल. ही मेट्रो आठ डब्यांची असेल आणि ती मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरे तसेच ठाणे शहर यांना जोडेल. हा मार्ग मेट्रो ११ (वडाळा ते सीएसएमटी) ला जोडल्यावर देशातील सर्वात लांब, म्हणजेच ५८ किलोमीटरचा मार्ग तयार होईल. एकनाथ शिंदे म्हणाले, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ठाण्याला मेट्रोतून वगळण्यात आले होते, तेव्हा आम्हाला आंदोलन करावे लागले होते. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर प्रकल्पाला गती मिळाली, पण २०१९ नंतर महाविकास आघाडीच्या काळात हे काम थांबले. २०२२ मध्ये मी मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा कामाला सुरुवात झाली. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प पूर्ण होत आहे, हे ठाणेकरांसाठी एक मोठे यश आहे. देशातील ५८ किलोमीटरचा सर्वात लांब एलिव्हेटेड मार्ग तयार 1 लांबी आणि खर्च : मेट्रो ४ आणि ४ अ मार्गाची एकूण लांबी ३५ किलोमीटर असून यासाठी सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे उर्वरित काम लवकरच सुरू होणार आहे. 2 प्रवासाची सोय : हा मार्ग पूर्ण झाल्यावर दररोज सुमारे १३.४३ लाख प्रवासी प्रवास करतील, ज्यामुळे प्रवासाचा वेळ ५० ते ७५ टक्क्यांनी कमी होईल, असेही सांगण्यात आले. 3 देशातील सर्वात लांब मार्ग : हा मार्ग मेट्रो ११ (वडाळा ते सीएसएमटी) ला जोडला जाईल, ज्यामुळे देशातील ५८ किलोमीटरचा सर्वात लांब एलिव्हेटेड मार्ग तयार होईल. दररोज २१ लाख लोक प्रवास करतील. 4 भविष्यातील विस्तार : या मेट्रो मार्गामुळे कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर अशा शहरांना जोडणी मिळेल, ज्यामुळे संपूर्ण एमएमआरमधील कोंडी कमी होईल. मेट्रोला हिरवी झेंडी दाखवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी. अनेक वर्षांपासूनची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यासह परिसरात मेट्रो सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. आता हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनी आनंद व्यक्त करून सरकारचे आभारही मानले आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/L1GfEhn
विकासाला गती:ठाण्याच्या मेट्रोवरून श्रेयवादाची रस्सीखेच; फडणवीस-शिंदे यांच्यात जुगलबंदी, दररोज 13.43 लाख जण करू शकतील प्रवास
September 22, 2025
0