मुकुंदवाडी भागात २०१२ मध्ये खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्याच्या ६ आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारातून धूम ठोकली. पण नंतर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच ते पुन्हा पोलिसांत हजर झाले. सोमवारी (२२ सप्टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास पसार झालेले आरोपी मंगळवारी सकाळी परतले. त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शेख जफियाबी शेख मुनाफ (३०), वाहेद खान अली खान पठाण, बाबा वाहेद खान पठाण (२२), जमीर खान वाहेद खान पठाण (२०), सुलतानाबी शेख बाबू (४०), शेख मोईन शेख बाबू (२२, सर्व रा. हनुमान मंदिराजवळ, गारखेडा) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली. मुकुंदवाडी भागात २०१२ मध्ये ७ जणांनी एकाला बेदम मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रकरणी त्यांना अटक करून जामीन मिळाला होता. त्यानंतर न्यायालयाने वारंवार सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देऊनही त्यांच्यातील कोणीही हजर राहत नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जामीनदाराला आदेश देऊन सर्वांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. या सुनावणीसाठी ७ आरोपी न्यायालयात हजर झाल्यावर जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायदंडाधिकारी आर. डी. खेडकर यांनी सर्वांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कोर्ट पैरवी भाऊसाहेब बोर्डे रिमांड वॉरंट आणण्यासाठी क्लर्ककडे गेले. यावेळी ६ आरोपींनी न्यायालयाच्या आवारातून पळ काढला. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार बलराम चौरे करत आहेत. सर्व आरोपी फोन केल्यावर येणार नाही म्हणाले सर्व आरोपी सध्या बाहेरच असल्याने आरोपींच्या नातेवाइकांच्या माध्यमातून त्यांना संपर्क करण्यात आला. मात्र, त्यांनी त्या वेळी पुन्हा हजर होण्यास नकार दिला होता. न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल झाल्यास पुन्हा कधीच बाहेर येता येणार नाही, अशी भीती एकाने घातल्याने ते स्वतः न्यायालयात हजर झाल्याची माहिती समोर आली आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/MKLRAnN
संभाजीनगर न्यायालयातून 6 आरोपी पसार:गुन्हा दाखल होताच परतले, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; सुनावणीला सातत्याने गैरहजर
September 23, 2025
0