Type Here to Get Search Results !

आम्ही पण दादागिरीतून आलो आहोत:निधी वाटपावरून ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत आक्रमक, एकनाथ शिंदेंसमोर व्यक्त केला संताप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी निधी वाटपाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्याचा आधार घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मुंबईतील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी थेट पोस्टर दाखवून हा मुद्दा उचलून धरला, ज्यामुळे बैठकीत चांगलाच गदारोळ झाला. माजी आमदार सदा सरवणकर यांनी दोन दिवसांपूर्वी, आमदारांना दोन कोटी निधी मिळतो, पण मी आमदार नसतानाही मला 20 कोटी रुपयांचा निधी मिळतो, असे विधान केले होते. याच वक्तव्याचा संदर्भ देत आमदार महेश सावंत यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर निधी वाटपातील असमानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महेश सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हटले की, तुमच्या आमदारांना तुम्ही निधी दिला आणि त्यांनी स्वतःचा विकास केला. माजी आमदार बोलत आहेत की त्यांना 20 कोटी रुपयांचा निधी मिळतो, आणि आम्हाला काहीच मिळत नाही. साहेब, तुमच्या नावाने दादागिरी सुरू आहे पण आम्हीही 'दादा'गिरीतून आलो आहोत. तुमच्या माजी आमदारांना तुम्ही खूप निधी दिला आहे, पण कामे झालेली नाहीत, त्यांनी तो निधी स्वतःच्या विकासासाठी वापरला आहे. तुम्ही तुमच्या माजी आमदारांना समज द्यावी, त्यांना कानमंत्र द्यावा. यासोबतच त्यांनी निधीसाठी अनेक पत्रके देऊनही निधी मिळत नसल्याची खंतही व्यक्त केली. आमदार महेश सावंत यांनी मतदारसंघातील स्थानिक समस्यांकडेही लक्ष वेधले. त्यांनी मुंबईतील माहिम किल्ल्याच्या सुशोभीकरणाची आणि किल्ल्याच्या परिसरात सायकलिंग ट्रॅक तयार करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली. तसेच, माहिममधील दोन शाळांपैकी एक जमीनदोस्त झाली असून, उरलेल्या एका शाळेची डागडुजी करून तिथेच वर्ग सुरू करण्याची विनंतीही त्यांनी केली. याव्यतिरिक्त, महेश सावंत यांनी इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. सिद्धिविनायक मेट्रो स्थानकासमोर हत्तीचा आकर्षक पुतळा असूनही तो अद्याप बसवला गेला नाही. याचे कारण मेट्रो आणि पालिकेतील समन्वयाचा अभाव असल्याचे त्यांनी सांगितले. दादरसारख्या महत्त्वाच्या विभागातील पोलीस ठाणे सध्या म्हाडाच्या इमारतीत आहे. त्यामुळे, त्याला स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. मुंबईतील महत्त्वाच्या पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी देखील महेश सावंत यांनी केली आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/bk0Pl5L

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.