कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. मुश्रीफ म्हणाले की, आम्ही लंडनवारीमध्ये असताना या दोन्ही नेत्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या जागा वाटून घेतल्या आहेत. एकाने 80 जागा घेतल्या तर दुसऱ्याने 81 जागा वाटून घेतल्या. हसन मुश्रीफ यांनी पुढे स्पष्ट केले की, हे दोन्ही पक्ष महानगरपालिकेच्या सत्तेत गेली २५ वर्षे कुठेही दिसत नव्हते, आम्हीच सत्तेत होतो, ही गोष्ट त्यांना लक्षात घ्यावी लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या लगबगीमुळे आरोप-प्रत्यारोप वाढले असून, आम्हाला जमेत धरले जात नाही, म्हणून आम्हाला हे बोलावे लागते, असे सांगत मुश्रीफ यांनी महाडिक आणि क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला. पुढे बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, कोणी काहीही म्हटले तरी महानगरपालिका आम्हाला ताकदीने लढावी लागेल. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे मी काही भाकीत करणार नाही. त्या ठिकाणी कदाचित बंडखोरी होईल, पण आमचे ठरले आहे ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युती करायची. ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर लढायचे. तसेच महापालिकेवर युतीचा झेंडा फडकवायचा असल्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. सगळ्यात जास्त जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या निवडून येतील अशी तयारी आम्ही केली आहे. ज्यांचे नगरसेवक होते त्या जागांचे पहिल्यांदा वाटप होईल आणि त्या नंतर उरलेल्या जागांवर चर्चा करून वाटप होईल, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याविषयी केलेले वादग्रस्त विधानावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याशी संबंध जोडणे पूर्णपणे चुकीचा असल्याचे ते म्हणाले. मोर्चा पडळकर यांच्या विरोधात असताना मुख्यमंत्र्यांवर टीका झाली. त्यामुळे सहाजिकच भारतीय जनता पक्षाला राग येणार, असे त्यांनी म्हटले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/eo2ZaGy
हसन मुश्रीफ यांचा महाडिक-क्षीरसागर यांना खोचक टोला:म्हणाले- आम्ही लंडनवारीवर असताना मनपाच्या जागा वाटून घेतल्या, आम्हाला गृहीत धरत नाहीत
September 26, 2025
0