Type Here to Get Search Results !

पुणे पुस्तक महोत्सव 13 ते 21 डिसेंबरला:फर्ग्युसन कॉलेज मैदानावर, 800 दालने आणि साहित्य महोत्सवाचे आयोजन

पुणे पुस्तक महोत्सव २०२५ चे तिसरे पर्व १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महोत्सवात भारतीय भाषांमधील ८०० पुस्तकांची दालने, साहित्य महोत्सव, बालकांसाठी विशेष विभाग, लेखक कॉर्नर, दररोज पुस्तक प्रकाशन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) द्वारे आयोजित या महोत्सवाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि समर्थ युवा फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागानेही या कार्यक्रमाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. आयोजकांनी यंदा १५ लाखांहून अधिक वाचक आणि पुस्तकप्रेमींच्या भेटीची अपेक्षा व्यक्त केली असून, काही कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. या महोत्सवाचे उद्घाटन १३ डिसेंबर रोजी एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या हस्ते होणार आहे. गेल्या वर्षी ७०० दालने होती, ती यंदा वाढून ८०० झाली आहेत. गेल्या वर्षी तीन दिवसांचा असलेला साहित्य महोत्सव यंदा सहा दिवसांचा असेल. यापैकी तीन दिवस मराठी भाषेतील साहित्यिक, शैक्षणिक आणि वैचारिक कार्यक्रमांसाठी राखीव असतील, तर उर्वरित तीन दिवस विविध भाषांमधील कार्यक्रमांसाठी असतील. या साहित्य महोत्सवासाठी नामांकित साहित्यिक, लेखक, पत्रकार आणि कलाकारांना आमंत्रित केले जाणार आहे. बालकांसाठी 'चिल्ड्रेन कॉर्नर'मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कार्यशाळा आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जातील. 'जॉय ऑफ रीडिंग' या विषयावर छायाचित्रकारांची स्पर्धाही घेण्यात येणार आहे. तसेच, खवय्यांसाठी ३० हून अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध असतील. या महोत्सवाचा समारोप २१ डिसेंबर रोजी होईल. पुणे पुस्तक महोत्सवात होणाऱ्या सर्व साहित्यिक, सांस्कृतीक, वैचारिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुस्तक महोत्सव आहे. या महोत्सवाला अधिक भव्य करण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. - युवराज मलिक, संचालक, राष्ट्रीय पुस्तक न्यास पुणे पुस्तक महोत्सव २०२५ हा फक्त पुस्तकांचा मेळा नाही, तर तो ज्ञान, संस्कृती, सर्जनशीलता आणि राष्ट्रीय भावनेचा उत्सव आहे. हा पुणेकरांचा महोत्सव असून, वाचन चळवळ दिवसेंदिवस समृद्ध होत आहे. त्यामुळे सर्व पुस्तकप्रेमी, वाचनप्रेमी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी या अद्वितीय महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. - राजेश पांडे, मुख्य संयोजक , पुणे पुस्तक महोत्सव

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ejl4QOU

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.