एकनाथ शिंदे यांनी गोरेगावातील दसरा मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत आणि थेट आरोप करत हल्लाबोल केला. त्यांच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यावरही शिंदेनी जोरदार टीका केली. तुम्ही एक बिस्किटचा पुडा तरी नेला का? असा सवाल शिंदेंनी केला. तसेच एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सर्वच गमावले, अशी टीकाही शिंदे यांनी केली. सावरकरांवर टीका करणाऱ्यांच्या शेजारी बसता. बाळासाहेब असते, तर उलटे टांगून धुरी दिली असती, असा घणाघातही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यांपर्यंत आणि काँग्रेसशी केलेल्या युतीपर्यंत अनेक आघाड्यांवर उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोला चढवला. "आम्ही आधी मदतीचे ट्रक पाठवले, नंतर मी गेलो; पण काही लोक फक्त फोटो काढायला आणि नौटंकी करायला गेले," असा टोला लगावत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना कठोर शब्दांत सुनावले. फोटोग्राफरला फोटोशिवाय दुसरे काय दिसणार? पूरग्रस्तभागात शिंदेंच्या शिवसेनेकडून मदत देण्यात आली होती. मात्र, त्यावर फोटो असल्यामुळे ठाकरे गटाकडून शिंदेंवर जोरदार टीका झाली. या टीकेला एकनाथ शिंदे आज दसरा मेळाव्या जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधकांना फोटो दिसतात, पण त्यातील सामान दिसत नाही. पूरग्रस्तांना २६ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू दिल्यात. तुम्ही एक बिस्किटचा पुडा तरी घेऊन गेलात का? तेवढा तरी न्यायचा असता. तेवढी तरी दानत दाखवायची होती. तुमचे फोटो पण लावून आमचे कार्यकर्ते आपत्तीच्यावेळी मदत करत होते ना? तेव्हा बरं वाटत होते. कार्यकर्ते लावतात फोटो. पण फोटोग्राफरला फोटोशिवाय काय दिसणार? असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. काही लोक फक्त जाऊन नौटंकी करून आले. पण आम्ही जायच्या आधी मदतीचे ट्रक गेले. आधी मदत गेली, नंतर एकनाथ शिंदे गेला, असे ते म्हणाले. पीएम केअर फंड कोविडसाठी होता, एवढे कळत नाही का? केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून पूरग्रस्तांसाठी निधी द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावरून एकनाथ शिंदे हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे म्हणाले, पीएम केअर फंडातून पैसे द्या म्हणत आहेत, पण तो फंड कोविडसाठी होता, एवढे कळत नाही का? तुम्ही कोविडमध्ये सहाशे कोटी जमा केले, एक पैसा तरी खर्च केला का? तुम्हाला पंतप्रधानांवर आरोप करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला. बाळासाहेबांनी उलटे टांगून धुरी दिली असती एकनाथ शिंदे म्हणाले, राहुल गांधी सावरकरांवर मुद्दामहून टीका करतात, हे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि आम्ही हिंदुत्व असल्याचे सांगतात. हे तुमचे बेगडी हिंदुत्व आहे. बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगून खालून मिरचीच धुरी दिली असती. सावरकरांचा अपमान केल्यावरही मूग गिळून, त्यांच्या बाजुला जाऊन बसता. पाकिस्तानचे झेंडे फडकवता. बॉम्बस्फोटातील आरोपींना तुमच्या प्रचारात फिरवता. बॉम्बस्फोटातील आरोपींच्या कबरी सजवता, हे हिंदुत्व आहे का तुमचे? बाळासाहेबांचे हिंदुत्व तुम्ही २०१९ ला काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली तेव्हाच सोडले. माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही. काँग्रेसी पंचसुत्री काढून टाका असे बाळासाहेबांनी म्हटले होते. ते काढायचे सोडून तुम्ही त्यांना डोक्यावर घेतले. उद्धव ठाकरेंनी एका खुर्चीसाठी सर्व गमावले एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार विसरले. आता बाळासाहेबांचा विचार येतोय का? एका खुर्चीसाठी सगळं घालावले. पक्षाचा प्रमुख हा पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो का? हे पक्षप्रमुख नाहीत, तर कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर नंबरवरून टीका केली, ते वरून खाली आले. तुम्ही घरात बसून वर गेला. किती टीका करता. तुमच्या सारखा रंग बदलणारा मी कधीच पाहिला नाही. 30 वर्षांची माया कुठे गेली, लंडनला? मुख्यमंत्री सहायता निधीतून तुम्ही अडीच वर्षात अडीच कोटी रुपये दिले. या एकनाथ शिंदे अडीच वर्षात साडेचारशे कोटी दिलेत. एकनाथ शिंदेने जे दिले, या हाताचे त्या हाताला कळू दिले नाही. जात-पात-धर्म-पाहिला नाही. तीस वर्ष मुंबई महापालिका ओरबाडून घेतले, ते कुठे गेले. एवढी माया कुठे गेली, लंडनला? असा बोचरा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला. आम्ही दिल्लीत १० जनपथला मुजरे करायला जात नाहीत आम्ही दिल्लीला जातो, पण तुमच्यासारखे १० जनपथला मुजरे करायला जात नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी पैसे आणायला जातो. केंद्राने महाराष्ट्राच्या विकासासाठी १० लाख कोटी रुपये दिले. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे, काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न कुणी पूर्ण केले? मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले आणि त्यांच्यावर तुम्ही टीका करताय.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/uFpaiJ5
30 वर्षांची माया कुठे गेली, लंडनला?:पूरग्रस्तांना तुम्ही बिस्किटचा पुडा तरी नेला का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना तिखट टोला
October 02, 2025
0