शहरातील सहाव्या शतकातील छत्रपती संभाजीनगर लेणी परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननावर बंदी घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर करण्यात आली आहे. खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून न्यायालयाचे मित्र ॲड. चंद्रकांत थोरात यांना सविस्तर याचिका सादर करण्यासाठी नियुक्त केले होते. याचिका नुकतीच सादर केली असून लेणी परिसरातील ३८.६० हेक्टर जागेवर अवैध उत्खनन झाल्याचे नमूद केले आहे. जिल्हाधिकारी व पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक यांनी वारसा जतन आणि पर्यटन विकासासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची विनंती केली आहे. परिसरातील गट नं. २९ मधील उत्खनन त्वरित थांबविण्याची आवश्यकता विशद केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी २७ जून २०२५ रोजी सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. त्याअनुषंगाने खंडपीठात याचिका सादर करण्यात आली. यात जिल्हाधिकारी, पर्यटन विभाग राज्य शासन, पुरातत्त्व विभाग केंद्र शासनाचे महासंचालक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अधीक्षक पुरातत्त्व विभाग छत्रपती संभाजीनगर व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. अाता याचिकेची सुनावणी न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेश वेणेगावकर यांच्यासमोर होईल. जिल्हाधिकारी व पुरातत्त्व विभागाने संयुक्त कार्यवाही करणे गरजेचे रोज शेकडाे ट्रॅक्टर्स एवढे अवैध उत्खनन उत्खनन लेणीच्या पायथ्याशी पोहोचले आहे. प्रतिदिन शेकडो ट्रॅक्टर्स ट्रॉली एवढे अवैध उत्खनन केले जात असल्याचे ॲड. चंद्रकांत थोरात यांनी याचिकेत नमूद केले आहे. पुरातत्त्व विभागासह महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. देशी-विदेशी पर्यटकांची रीघ प्रतिवर्षी देशी व विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने लेणी बघण्यासाठी येतात. उत्खननामुळे मोठ्या प्रमाणावर विद्रूपीकरण होते. मोठ्या प्रमाणावर झालेली अतिक्रमणे लेणींच्या सौंदर्यात बाधा निर्माण करतात. बेकायदेशीर उत्खनन करणारांसाठी शिक्षा व दंडाची तरतूद केली आहे. पुरातत्त्व विभागाची कायदेशीर जबाबदारी उत्खनन रोखण्याची आहे. राष्ट्रीय वास्तू व पर्यटनाची जपणूक करणे ही घटनात्मक जबाबदारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय स्मारकापासून बफर झोनमध्ये अशा प्रकारे अतिक्रमण व अवैध उत्खननास आळा घातला पाहिजे, असेही ॲड. चंद्रकांत थोरात यांनी नमूद केले आहे. ब्लास्टिंगमुळे लेणीच्या राष्ट्रीय स्मारकास धोका छत्रपती संभाजीनगरच्या लेणींची सहाव्या ते आठव्या शतकादरम्यान निर्मिती झाली असून राष्ट्रीय स्मारकात त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. लेणी परिसरातील गट क्र. २९ मध्ये ३८.६० हेक्टर जागेचा अंतर्भाव केला आहे. येथील जागेत अनधिकृतपणे मुरुमाचे उत्खनन केले जात आहे. जेसीबी व पोकलेनच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या उत्खननात प्रसंगी ब्लास्टिंगचा वापर केला जातो. यामुळे राष्ट्रीय स्मारकास धोका निर्माण झाला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/r47c65u
याचिका:छत्रपती संभाजीनगर लेणी परिसरात 38.60 हेक्टर जागेवर अवैध उत्खनन; वारसा जतन, पर्यटनासाठी राज्याकडे प्रस्ताव देण्याची मागणी
October 05, 2025
0