भाजप आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. म्हैसवाड येथे बोलताना खोत यांनी जयंत पाटील यांनी जिल्ह्यात अनेक साखर कारखाने हाणले असल्याचा गंभीर आरोप करत, राष्ट्रवादी हा पक्ष नसून लुटारूंची आणि गुंडांची टोळी आहे, अशी थेट टीका केली. राजारामबापू पाटील यांनी अनेक माणसे उभी केली, पण जयंत पाटील यांनी तीच माणसे उभी केलेल्यांचे साखर कारखाने घ्यायला सुरुवात केल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली. जयंत पाटलांनी जिल्ह्यातील अनेक कारखाने हाणले. त्यांनी संभाजी पवार यांचा कारखाना हाणला, त्याचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत खोत यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. खंडे नवमीच्या निमित्ताने बोलताना खोत म्हणाले, खंडे नवमीला हत्यारांचे पूजन होते, आता ही हत्यारे आम्ही हातात घेणार आहोत. दिलीप पाटलांनी आईला शिव्या दिल्या सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिलीप पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, दिलीप पाटील यांनी मला व माझ्या आईला शिव्या दिल्या. माझ्या आईने कधी चुकीचे बोलले नाही. बावची फाट्यावर जयंत पाटील यांच्या गुंडाने मला मारले, तेव्हा तुम्हाला वाईट वाटले नाही का? तुमची संस्कृती कुठे गेली होती? असा सवाल त्यांनी केला. सदाभाऊ खोत यांनी दिलीप पाटील यांना इशारा देत म्हटले, तुम्ही आमच्या वाट्याला गेला तर आम्ही तुमचे वार उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. तसेच, जिल्हा बँकेच्या नोकर भरतीत दिलीप पाटील यांनी मोठा भ्रष्टाचार केला असून, त्यावर प्रशासक नेमावा, अशी मागणीही खोत यांनी केली. जिल्हा बँक आणि 'राष्ट्रवादी'वर गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला. एका व्यक्तीने घोटाळा बाहेर काढला म्हणून त्याच्यावर ५० कोटींचा दावा ठोकला गेला आहे, त्यामुळे बँकेची तातडीने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मी उगाच आमदार झालो नाही, बारामतीला पाणी पाजून आलोय, असे ते म्हणाले. देवा भाऊ हा प्रस्थापितांचा कर्दनकाळ आहे. आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, तर तुम्ही नेहमी गाववाड्यातील लोकांना पायाखाली ठेवले म्हणून आम्ही जन्माला आलो आहोत, असे म्हणत खोत यांनी हल्लाबोल केला.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/6RmJWDs
जयंत पाटलांनी जिल्ह्यातील कारखाने हाणले:राष्ट्रवादी पक्ष नव्हे, लुटारूंची टोळी; सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल
October 01, 2025
0