भंडाराच्या उपविभागीय अधिकारी (एसडीओ) माधुरी तिखे आपल्या पतीसह शासकीय वाहनातून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनाविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेल्या असता त्यांचे वाहन उलटल्याने त्या जखमी झाल्या. याप्रकरणी नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील श्रीखंडा गावातील टिप्पर चालक दीपक अशोक बुरे याला पोलिसांनी १० ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीला १२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दुसरा आरोपी, बोलेरो चालक फरार आहे. उपविभागीय अधिकारी माधुरी विठ्ठल तिखे यांचे वाहन गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता कारधा पोलिस स्टेशन हद्दीतील दवडीपार ते पचखेडी स्मशानभूमी रस्त्यावर उलटले. उपविभागीय अधिकारी तिखे हे त्यांचे पती शाहबाज शेख (३२) यांच्यासोबत शासकीय वाहनाने वाळू तस्करीविरोधात कारवाई करण्यासाठी निघाले होते. यादरम्यान, वाळूने भरलेला टिप्पर आढळला. तिखे यांना महाखनिज अॅपवर वाळूने भरलेल्या ट्रकमध्ये रॉयल्टी नसल्याचे आढळले. तिखे यांनी त्यांचे पती शाहबाज शेख यांच्यासह ट्रकचा पाठलाग केला. यादरम्यान, बोलेरो वाहनाच्या चालकाने त्यांचे वाहन दोन्ही वाहनांच्या मध्ये आणले. आरोपींनी वारंवार ब्रेक दाबून टिप्पर पकडण्याच्या कारवाईत अडथळा आणला. बोलेरो चालकाने उपविभागीय अधिकाºयांच्या वाहनाला कट मारली. त्यामुळे वाहन शेतात जाऊन उलटले. यामध्ये उपविभागीय अधिकारी व त्यांचे पती जखमी झाले. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांनी कारधा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून, बोलेरो वाहनचालक आणि टिप्पर चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०९, १३२, ३ (५), ३०३ (२), भारतीय न्याय संहिता सहकलम ४८ जमीन महसूल कायदा, उपकलम ७, ९, पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी १० ऑक्टोबर रोजी आरोपी टिप्पर चालकाला पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला १२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील दुसरा आरोपी बोलेरो चालक अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत साखरे करत आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/jKi9X6m
एसडीओंवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक:बोलेरो चालक फरार, आरोपीला पोलिस कोठडी
October 10, 2025
0