सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लोणंदमध्ये २२ वर्षांच्या तरूणाची भिंतीवर डोके आपटून आणि पट्ट्याने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. ही घटना उघडकीस येताच लोणंदमध्ये खळबळ उडाली. या घटनेचा अवघ्या दोन तासात छडा लावण्यात लोणंद पोलिसांना यश आले. गणेश संतोष गायकवाड (रा. पिंपळसुटी, ता. शिरूर, जि. पुणे, सध्या रा. लोणंद), असे मृत तरूणाचे नाव असून त्याच्या अल्पवयीन रूम पार्टनरनेच हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. लोणंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश गायकवाड हा लोणंद एमआयडीसी परिसरात कामाला आणि माळीआळी परिसरात वास्तव्यास होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित अल्पवयीन मुलगा लोणंद येथे शिक्षण घेत आहे. दोघांची मेसमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर दोघे एकाच खोलीत भाड्याने राहत होते. अभ्यास आणि मोबाईल वापरावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर गणेश झोपेत असताना रूम पार्टनरने रागाच्या भरात त्याचे डोके भिंतीवर आपटून, कमरेच्या पट्ट्याने गळा आवळल्याने गणेशचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली. तरुणाच्या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉडला घटनास्थळी पाचारण करून पुरावे गोळा करण्यात आले. या घटनेची माहिती मृताच्या रूम पार्टनरने दिली असल्याने पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली. अखेर त्याच्याच कबुली जबाबातून हत्येचा उलगडा झाला. सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले, उपनिरीक्षक रोहित हेगडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेने हा तपास केला. संशयिताची सुधारगृहात रवानगी तरुणाच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन संशयिताला बाल न्यायालयात हजर केलं होतं. त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. या घटनेच्या तपासासाठी उद्या पुन्हा त्याची चौकशी केली जाणार आहे. - सुशील भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/yx1Fpei
मोबाईलवरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या:पट्ट्याने गळा आवळून संपवले, खबर देणारा रूम पार्टनरच निघाला आरोपी
October 28, 2025
0