काँग्रेसला सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवावी अशी राज ठाकरे यांची इच्छा आहे, असे उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. त्यामुळे मनसेत किंचित नाराजीचा सूर उमटला. आमची भूमिका राज किंवा आम्हीच जाहीर करू, असे मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, नेते बाळा नांदगावकर यांनी जाहीर केले. त्यानंतर राऊत यांनी निवडणूक आयोगाला भेटणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश हवा असे राज यांचे म्हणणे आहे, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीत राज्यातील पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा सूर लावला. राज यांना मविआमध्ये घेण्याचे उद्धव ठाकरे तसेच खा. राऊतांचे यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘मविआत नव्या भिडूची गरज नाही’ असे म्हटले. त्यावर राऊत म्हणाले की, मविआतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसलाही सोबत घेणे गरजेचे आहे. ही त्यांची एक भूमिका आहे. मात्र, याचा अर्थ तो निर्णय नाही. सकाळी खा. राऊत यांनी मनसेविषयी केलेल्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली. मनसे नेते म्हणाले की, आमची काँग्रेसविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. तसा काही निर्णय झाला तर त्याची घोषणा अन्य कुणी नाही तर राज ठाकरेच करतील. राज ठाकरेंसाठी राहुल गांधींच्या मनधरणीचे राऊत यांचे प्रयत्न मनसेला मविआत घेण्यासाठी काल माझी सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी चर्चा झाली. मी राहुल गांधींशी तर उद्धव ठाकरे मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा करतील, असे राऊत म्हणाले. राज ठाकरेंची सुपारी घेतली आहे का? : भाजपचा सवाल भाजपचे प्रसारमाध्यम समन्वयक नवनाथ बन या घडामोडीवर म्हणाले की, खा. राऊतांनी उद्धव ठाकरेंना मराठी आणि हिंदुत्वापासून दूर नेले. आधी उद्धवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली, आता राज ठाकरेंना बांधणार काय? आता त्यांनी राज ठाकरेंची सुपारी घेतली आहे का?
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/X2v8LdB
राज ठाकरेेंची भूमिका खा. राऊतांनी परस्पर जाहीर केल्याने मनसे नाराज:काँग्रेसला सोबत घेण्याची राज यांची इच्छा असल्याचे स्पष्ट केले
October 13, 2025
0