छत्रपती संभाजीनगर: परिचारिका सेवा प्रवेश नियमातील ८०:२० टक्के आरक्षणाच्या विरोधात मेल नर्सेस बचाव समितीने छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा काढला. क्रांती चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चात समितीने हा नियम रद्द करण्याची मागणी केली. या नियमानुसार पुरुष परिचारकांना केवळ २० टक्के संधी मिळत असल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. या ८०:२० नियमामुळे नर्सिंग व्यवसायात पुरुष उमेदवारांसाठी संधी कमी होते. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४ ते १७ आणि २१ नुसार समानता, भेदभावास मनाई आणि संधीची समानता याची हमी दिली जाते. मात्र, हा नियम या तरतुदींच्या विरोधात असल्याने हजारो पुरुष नर्सिंग उमेदवारांना सरकारी सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ही निवड प्रक्रिया गुणवत्तापूर्ण असावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. वैद्यकीय संचालनालयाने ११ जून २०२५ रोजी हा नियम लागू केला आहे. या नियमामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी असून, त्याविरोधात सातत्याने आंदोलने केली जात आहेत. यावेळी समितीने ८०:२० हा नियम तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. तसेच, संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि संवैधानिक पद्धतीने राबवण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. मोर्चादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, ज्यात पुरुष आणि महिला परिचारिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/BfuXCGS
80:20 नियम रद्द करण्यासाठी मेल नर्सेस समितीचा मोर्चा:पुरुष परिचारकांना 20% संधी; छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
October 13, 2025
0