आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने 'मिशन लोटस' पुन्हा सक्रिय केले असून, सोलापूर जिल्ह्यात सर्वात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील किमान पाच माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यापैकी चार माजी आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचेही समजते. साळुंखेंवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पक्षप्रवेशाचे संकेतही दिले होते. मात्र, साळुंखे यांच्या भाजप प्रवेशाला पक्षातूनच जोरदार विरोध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन थेट साळुंखे यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. देशमुख यांनी दावा केला आहे की, "पद्मभूषण वसंतदादा पाटील सहकारी सुतगिरणी, विद्या विकास मंडळ, बळीराजा फलोत्पादक संघ आणि स्वस्त धान्य दुकान अशा चार प्रकरणांमध्ये दीपक साळुंखे यांनी घोटाळा केला असून, या प्रकरणांची चौकशी सुरू आहे." श्रीकांत देशमुख यांचा आरोप: "शासन निधीचा अपहार, बेकायदेशीर कर्ज, खोटी कागदपत्रे आणि कोट्यवधीचा अवैध व्यवहार त्यांनी केला आहे. अशा व्यक्तीला भाजपने पक्षात घेणे योग्य नाही. माझा त्यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध आहे." राजकीय फटाके पुढेही फुटत राहतील या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला येथे बोलताना, "सध्या सोलापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने दिवाळीचे राजकीय फटाके फुटत आहेत, ते पुढेही असेच फुटत राहतील," असे सूचक विधान केले होते. शरद पवार यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आणि सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षातील नेते असलेले दीपक साळुंखे, विधानसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीतून ठाकरेंच्या शिवसेनेत गेले होते, पण त्यांचा सांगोला मतदारसंघात पराभव झाला होता. आता भाजपच्या 'मिशन लोटस'मध्ये पालकमंत्र्यांचे संकेत आणि माजी जिल्हाध्यक्षांचा तीव्र विरोध यामुळे दीपक साळुंखे यांचे 'कमळ' फुलणार की नाही, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/QHxGRi2
सोलापुरात 'मिशन लोटस'ला ब्रेक?:भाजप नेत्याचाच माजी आमदाराच्या पक्षप्रवेशाला विरोध
October 20, 2025
0