Type Here to Get Search Results !

लग्नाची पत्रिका वाटायला आलेल्या युवतीचा अपघाती मृत्यू:भावासह परतताना काळाचा घाला, सिंधुदुर्गातील दुर्दैवी घटना

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक धक्कादायक व हृदयद्रावक घटना घडली आहे. खास मुंबईहून आपल्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गावी आलेल्या एका युवतीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना तळवडे आंब्रड मार्गावर घडली असून, निकीता सावंत (वय अंदाजे), असे या मृत युवतीचे नाव आहे. ती फोंडाघाट गांगोवाडी येथील रहिवासी होती. या अपघातात तिचा भाऊ वैभव सावंत किरकोळ जखमी झाला आहे. नेमका अपघात कसा झाला? निकीता दिलीप सावंत ही काही दिवसांपूर्वीच मुंबईहून तिच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गावी आली होती. तिचे लग्न येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणार होते. पत्रिका वाटप सुरू असतानाच तिने आपल्या सख्या भावासोबत (वैभव सावंत) मामाकडे पत्रिका देण्यासाठी दुचाकीवरून आंब्रडहून फोंडाघाटकडे प्रवास करत होती. कसवण तळवडे येथील तीव्र उतारावर समोरून येणाऱ्या एस.टी. बसला बाजू देत असताना दुचाकी रस्त्यालगतच्या खडीवर घसरली. त्यामुळे दोघेही खाली पडले. निकीताच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली, तर तिचा भाऊ वैभव सावंत याला किरकोळ जखमा झाल्या. उपचारादरम्यान मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर अपघातानंतर एस.टी. बस चालक, वाहक आणि प्रवाशांनी त्वरित धाव घेत जखमी भाऊ-बहिणीला आंब्रड येथील डॉ. खटावकर यांच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निकीताला मृत घोषित केले. फोंडाघाट गांगोवाडी येथील दिलीप सावंत यांची कन्या असलेल्या निकीताच्या अकाली निधनामुळे सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाची पत्रिका छापून वाटप सुरू असतानाच काळाने हा घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातानंतर एस.टी. बस चालक कृष्णा नेरकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दुचाकीस्वार (वैभव सावंत) याच्यावर हयगयीने वाहन चालवून मृत्यूस कारण ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/accidental-death-of-a-young-woman-who-came-to-distribute-wedding-cards-136219673.html

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.