सुमारे अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेल्या मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी संशोधनाची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे आवाहन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मराठी भाषा विद्यापीठातर्फे आयोजित अभिजात भारतीय भाषांच्या दोन दिवसीय संयुक्त परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. ही परिषद संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी भवनमध्ये सोमवारपासून सुरू झाली. यावेळी संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बाराहाते, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ. मनिष जोशी, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुळकर्णी, उच्च शिक्षण सहसंचालक अभय खांबोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मराठीच्या विकासासाठी रिद्धपूर (ता. मोर्शी) येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे. या विद्यापीठाने गुणवत्तेची कास धरावी. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली. शासनाने मराठी विद्यापीठाचा विषय गांभीर्याने घेतला असून, आवश्यक जागा भरण्यासाठी आणि बांधकामासाठी सर्व परवानग्या दिल्या आहेत. जगात आज संशोधनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. संशोधनातून पेटंट आणि रॉयल्टी मिळवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे मराठीनेही यात मागे राहू नये. विद्यापीठाने अत्युच्च दर्जाची शिक्षण व्यवस्था, अभ्यासक्रम शिकवणारे तज्ज्ञ आणि सुसज्ज ग्रंथालय उभारावे, असे आवाहन पाटील यांनी केले. स्वातंत्र्यानंतर नोंदी ठेवणे कमी झाल्याने स्पष्ट आणि मुद्देसूद नोंदीसाठी पुढाकार घ्यावा. नोंदीबाबत परिषदेमध्ये मंथन व्हावे. मराठीच्या भविष्यातील वाटचालीत ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार असून, ती ऐतिहासिक ठरेल, असेही पाटील यांनी नमूद केले. यावेळी डॉ. आवलगावकर यांनी प्रास्ताविकातून परिषदेच्या आयोजनामागील भूमिका आणि मराठी विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला. किरण कुळकर्णी यांनी ही परिषद भाषेमध्ये मोठे काम करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे सांगितले. अभिजात भाषेच्या संदर्भात पूर्वी केलेले काम आणि भविष्यातील योजनांवर येथे एकत्रित चर्चा होणार आहे. परिषदेच्या सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडी काढण्यात आली. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटनाला सर्व ११ आद्य भाषांचे प्रत्येकी पाच याप्रमाणे ५५ प्रतिनिधी आणि स्थानिक भाषाप्रेमी उपस्थित होते.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ROyuvZq
मराठी भाषेला अधिक संशोधनाची गरज:उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिजात भाषा परिषदेत प्रतिपादन
October 06, 2025
0