दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना जिल्हा परिषदेमार्फत दिली जाणारी मदत आगामी दिवाळीपूर्वी वितरित होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. बुधवारी साबळे यांनी जिल्हा परिषदेच्या प्रभारी सीईओ प्रिती देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले आणि समाजकल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही मदत लवकरात लवकर वितरित करण्याची मागणी केली. जिल्हा परिषद सदस्य असताना प्रकाश साबळे यांनीच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचा प्रस्ताव मांडला होता. सभागृहात एकमत झाल्यानंतर प्रतिकुटुंब ५ हजार रुपयांची मदत देण्याचा ठराव संमत झाला होता. याशिवाय, कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंडविषयक आजार आणि अर्धांगवायूने ग्रस्त रुग्णांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत देण्याचे धोरणही जिल्हा परिषदेने निश्चित केले आहे. ही दोन्ही प्रकारची मदत जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून (सेस फंड) दिली जाते. दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ज्यातून दरवर्षी सुमारे एक हजार रुग्णांना मदत दिली जाऊ शकते. यावर्षी जिल्हा परिषदेकडे सुमारे ८०० प्रस्ताव आले असून, त्यापैकी बहुतांश प्रस्तावांची पडताळणी पूर्ण झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, यासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून लवकरच ही प्रक्रिया अंतिम केली जाईल. त्यानंतर संबंधितांच्या खात्यात मदत जमा केली जाईल. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांबाबतही अशीच स्थिती असून, ५० ते ६० प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. समाज कल्याण विभागाने यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. साबळे यांनी सीईओ संजीता महापात्र यांच्याशीही यासंदर्भात चर्चा केली आहे. त्या सध्या सुटीवर असल्या तरी, त्यांनी हा विषय प्राधान्याचा असल्याचे कळवले आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारची मदत दिवाळीपूर्वी संबंधितांना निश्चितपणे मिळेल, असे संकेत मिळाले आहेत.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/6kRKHF2
दुर्धर आजारग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना दिवाळीपूर्वी मदत:माजी जि.प.सदस्य प्रकाश साबळे यांच्या पाठपुराव्यानंतर सीईओ सकारात्मक
October 08, 2025
0