राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने नुकतीच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार यादीतील गंभीर त्रुटी निदर्शनास आणल्या. जोपर्यंत या त्रुटी दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत निवडणूक सहा महिने पुढे ढकलावी, अशी मागणी विरोधकांनी आयोगाकडे केली आहे. 'मीडिया हँडलिंग'वरून मोठा आरोप या मागणीच्या वेळीच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एका भाजप कार्यकर्त्यावर गंभीर आरोप करत नवा वाद निर्माण केला. वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, निवडणूक आयोगाचा मीडिया हँडलिंगचा भाग भाजपचा कार्यकर्ता असलेले देवांग दवे कसे सांभाळत आहेत? तसेच, मतदार यांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला होता. देवांग दवे यांचे आरोप फेटाळत जोरदार प्रत्युत्तर विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांनंतर देवांग दवे यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत, हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी भाजपमध्ये घराघरात पोहोचून काम करतो, हा विषय नवीन नाही, असे स्पष्ट करत त्यांनी महाविकास आघाडी दिशाभूल करत असल्याचा दावा केला. दवे यांनी आठवण करून दिली की, 2019 मध्येही साकेत गोखले नावाच्या व्यक्तीने असेच आरोप केले होते. देवांग दवे म्हणाले, त्यावेळी या प्रकरणाची चौकशी झाली होती आणि माझा आणि निवडणूक आयोगाचा काहीही संबंध नसल्याचं आढळून आल्यानं मला क्लिनचिट मिळाली आहे. २०१९ नंतर विरोधकांनी ईव्हीएमवर आरोप केले आणि आता ते व्होट चोरीचा आरोप करत आहेत. हे सर्व 'फेक नॅरेटिव्ह' पसरवण्याचे काम आहे, असे दवे यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना देवांग दवे यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, विरोधकांमध्ये गोंधळ आहे, त्यांनी आधी आपसात चर्चा करून तो दूर करावा. बिहारमध्ये निवडणुकांना विरोध करायचा आणि महाराष्ट्रात निवडणुका लवकर घेण्याची मागणी करायची, आणि आता पुन्हा युटर्न घ्यायचा. त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे, त्यामुळे त्यांनी पुढील रणनीती काय असावी, यावर विचार करावा, असा टोला दवे यांनी लगावला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/rP9Ol6A
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले:मतदार यादीतील त्रुटींवरून विरोधक आक्रमक, वडेट्टीवारांच्या आरोपांवर देवांग दवे यांचे प्रत्युत्तर
October 15, 2025
0