शेती हा जुगार बनत चालल्याची भावना बळावत आहे. पण येणाऱ्या संकटातून मार्ग काढत शेतीला नफ्यात आणणारेही काही निवडक लोक असतात. त्यापैकी एक सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कळंबवाडीचे शेतकरी दीपक जाधव. ५ किमीवरून पाइपलाइनद्वारे शेतात पाणी आणून त्याचे ड्रीपद्वारे नियोजन केले. पूर्णपणे शेणखत वापरून दीड एकरात कारल्याची बाग फुलवली. विशेष म्हणजे कारले उत्पादनाचा तुटवडा कधी निर्माण होतो, मागणी कधी वाढते यासंबंधी बाजारपेठेचा अभ्यास केला. परिणामी कारल्याच्या बागेतून महिना साडेपाच ते सहा लाखांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे. दीपक जाधव यांच्याकडे एकूण २५ एकर शेती आहे. एकच पीक घेण्याऐवजी ते पिकांसंदर्भात विविध प्रयोग करत असतात. सध्या त्यांनी २ एकरवर कारल्याची बाग लावली आहे. अतिवृष्टीमुळे यातील अर्धा एकर क्षेत्रावरील बागेचे नुकसान झाले, पण उर्वरित दीड एकरात योग्य पाण्याचे नियोजन करून भरघोस उत्पादन घेणे सुरू आहे. द्राक्ष बागेचे नुकसान झाल्यामुळे लावले कारले दीपक यांच्याकडे एकूण पंचवीस एकर शेती आहे. यात ४ एकरवर कांदा, १ एकरवर दोडका, दीड एकरवर कारले व इतर उर्वरित क्षेत्रावर गहू, ज्वारीचे पिक घेतले जाते. द्राक्ष बागेचे नुकसान झाल्यानंतर त्यांनी मांडव काढून टाकण्याऐवजी त्यावर आधी दोडके, भोपळा घेतला व त्यानंतर कारले लावले. हिवाळ्यात कारल्यावर किडीचा प्रार्दूभाव होऊन पिकाचे मोठे नुकसान होते. पण त्यांनी सुक्ष्म नियोजन करून स्वत:कडे असलेल्या गायींचे १० ट्रेलर शेणखत शेतात टाकले. ड्रीपद्वारे २४ तासांत ८ लिटर पाणी दिले. पाणी नेमक्या प्रमाणात मिळाल्याने चार एकर क्षेत्रावर जितके उत्पादन निघते तेवढेच उत्पादन अवघ्या दीड एकरात निघत आहे. खर्च-उत्पन्नाचे गणित असे जाधव यांनी सुरुवातीला २ एकर मांडवावर कारल्याची बाग लावली. पण अतिवृष्टीमुळे अर्धा एकर बागेचे नुकसान झाले. आधीचाच मांडव व ड्रीप असल्याने नव्याने ते टाकण्याची आवश्यकता भासली नाही. याचे तीन लाख वाचले. ६ हजारांना एक याप्रमाणे ६० हजारांचे १० ट्रेलर शेणखत त्यांनी टाकले. साडेसात हजारांचे मल्चिंग पेपर व किरकोळ खर्च असे एकूण ८० ते ८५ हजारांचा खर्च आला. लागवडीनंतर अडीच महिन्यांनी कारले तोडणीला येतात. सध्या दिवसाआड १५ किलोच्या ३० बॅगांत कारल्याचे ४५० ते ५०० किलो उत्पादन निघत असून याचे ३० हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. महिन्याला हे उत्पादन साडेचार ते पाच लाखांपर्यंत जाते. इतर कारल्याच्या तुलनेत किलोमागे १० रुपये अधिक म्हणजे ६० रुपयांचा दर मिळत असल्याचे जाधव यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले. (प्रगतिशील शेतकऱ्याकडून जाणून घ्या अधिक माहिती. संपर्कासाठी मोबाइल क्रमांक - ७७७५९०७९८५)
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/vMTWZJi
प्रगतिशील शेतकरी:द्राक्षाच्या मांडवावर कारल्याची बाग, दीड एकरात महिना सहा लाखांचे उत्पन्न, कळंबवाडीच्या शेतकऱ्याचा प्रयोग
November 16, 2025
0