उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान नाकारल्यामुळे न्यायालयात गेलेल्या नऊ उमेदवारांपैकी तिघांचे दावे मान्य झाले आहेत. तर सहा प्रकरणांमध्ये न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आदेश कायम ठेवले. न्यायालयीन लढाईमुळे मिळालेली माघारीची वाढीव मुदत बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली. यामुळे जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आता एकूण १३२५ उमेदवार रिंगणात आहेत. यात १२ नगराध्यक्षपदांसाठी ७१ आणि नगरसेवकांच्या २७८ जागांसाठी १२५५ उमेदवारांचा समावेश आहे. अंजनगाव सुर्जी येथील नगराध्यक्षपदासाठी एक, नगरसेवकपदासाठी दोन, अचलपूर व धारणी येथील नगरसेवकपदासाठी प्रत्येकी दोन, तसेच दर्यापूर व वरुड येथील नगरसेवकपदासाठी प्रत्येकी एक उमेदवार असे एकूण नऊ जण न्यायालयात गेले होते. उमेदवारी अर्ज नाकारण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश बेकायदेशीर असल्याचा त्यांचा दावा होता. गेले तीन दिवस ही न्यायालयीन लढाई सुरू होती. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करायचे असल्याने, त्यापूर्वीच या प्रकरणांचा निकाल लावणे अनिवार्य होते. त्यानुसार, सर्व नऊ प्रकरणांचे निकाल घोषित झाले. यात एका नगराध्यक्षासह दोन नगरसेवकांचे दावे मान्य झाले, तर नगरसेवकपदासाठीचे इतर सहा दावे न्यायालयाने फेटाळले. ज्यांचे दावे मंजूर झाले, त्यात अंजनगाव सुर्जी येथील आकाश राऊत आणि सय्यद अझरुद्दीन सय्यद अमीनोद्दीन, तसेच दर्यापूर येथील देविदास काळे यांचा समावेश आहे. आकाश राऊत हे अंजनगाव सुर्जीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत, तर इतर दोघे नगरसेवकपदाचे उमेदवार आहेत. माघारीची अंतिम मुदत संपल्यानंतर बुधवारी सर्व उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आली. सकाळी ११ वाजता ही प्रक्रिया सुरू झाली. राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांच्या उमेदवारांना त्यांची पक्षाची चिन्हे मिळाली. अपक्ष उमेदवारांना ट्रक, बस, ऑटोरिक्षा, रोडरोलर, नगारा, हेल्मेट, नारळ, छत्री, गॅस सिलिंडर, कपाट, टोपली, शिटी यांसारखी विविध चिन्हे देण्यात आली.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/5mAHpju
तीन उमेदवारांना कोर्टाचा दिलासा, सहा याचिका फेटाळल्या:अखेर चित्र स्पष्ट; नगराध्यक्षासाठी 71, नगरसेवकासाठी 1255 उमेदवार
November 26, 2025
0