राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणांगण तापले असतानाच, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना नेत्यांच्या जिभेवरील ताबा सुटत असल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांना थेट कापून काढण्याची भाषा वापरल्याने एकच खळबळ उडाली आहे. "हे सरकार देवेंद्र फडणवीसांचे आहे, ते गृहमंत्री आहेत आणि नागपूरचे आहेत. त्यामुळे जास्त कराल तर कापून काढू," अशी उघड धमकीच देशमुख यांनी भरसभेत दिली. विशेष म्हणजे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. नेमका वाद काय? कळमेश्वरमध्ये दोन दिवसांपूर्वी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये स्थानिक काँग्रेस उमेदवाराच्या पतीचे नाव समोर आले होते. या घटनेचा संदर्भ देत आशिष देशमुख यांनी आपल्या भाषणात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. "आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही काही करू शकत नाही असा होत नाही. आमची संस्कृती बिघडू नये, ही आमची भूमिका आहे. पण जर कोणी आमच्या नादी लागले, तर परिणाम वाईट होतील," असा दम आशिष देशमुख यांनी विरोधकांना भरला. एकंदरित निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांचा तोल सुटणे आणि वादग्रस्त विधाने करून वातावरण तापवणे, असे सध्या राज्यात सुरूच असल्याचे दिसत आहे. चंद्रशेखर बावनकुळेंच्या साक्षीने इशारा ही सभा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोरच आमदाराने अशी हिंसात्मक भाषा वापरल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे. एका बाजूला "कळमेश्वरची संस्कृती बिघडू नये," असे म्हणत असतानाच दुसरीकडे "कापून काढू" अशी भाषा वापरणे हे परस्परविरोधी असल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त करत आहेत. विकासाचा मुद्दा आणि आवाहन आपल्या भाषणात देशमुख यांनी विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील विविध योजना, विशेषतः आरोग्याच्या योजना कळमेश्वरमध्ये आणायच्या आहेत, असे ते म्हणाले. "येत्या दोन तारखेला प्रामाणिक आणि तुमच्यासाठी झटणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या," असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/NKy347M
फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर कापून काढू:भाजप आमदाराची विरोधकांना उघड धमकी, बावनकुळेंच्या उपस्थितीत केले विधान
November 27, 2025
0