अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतांसाठी नाला खोलीकरण करून त्यातील सुपीक गाळ मोफत देण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. मुसळधार पावसामुळे शेतातील बांध फुटले असून पिकांसोबतच जमिनीचा महत्त्वाचा सुपीक थरही वाहून गेला आहे. या नैसर्गिक धक्क्यामुळे शेतकऱ्यांची जमीन कडक, निर्जीव आणि उत्पादनक्षमतेपासून वंचित झाली आहे. बांध फुटल्याने शेतातील मुरूम, वाळू आणि दगड बाहेर आले आहेत, तर काळी भुसभुशीत माती पूर्णपणे वाहून गेली आहे. यामुळे आगामी हंगामात पेरणी करणे कठीण होणार असून लागवडीचा खर्चही वाढणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांच्या मते, नाल्यात वर्षानुवर्षे साचलेला गाळ सेंद्रिय अन्नद्रव्यांनी परिपूर्ण असून जमिनीची सुपीकता पुन्हा वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हा गाळ मिळाल्यास जमीन पुन्हा भुसभुशीत होईल, पाण्याची धारण क्षमता वाढेल आणि अतिवृष्टीमुळे बिघडलेला जमिनीचा पोत नैसर्गिकरीत्या सुधारेल. त्यामुळे नाला खोलीकरणाची कामे तातडीने हाती घेऊन त्यातून निघणारा सुपीक गाळ शेतकऱ्यांच्या शेतात मोफत देण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. तसेच, गाळ वाहतुकीसाठी विशेष सरकारी यंत्रणा आणि वाहने उपलब्ध करून द्यावीत. अतिवृष्टीग्रस्त आणि बांध फुटलेल्या शेतकऱ्यांना गाळ वितरणात प्राधान्य मिळावे, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. या उपाययोजना न झाल्यास हजारो एकर जमीन पुढील काही हंगामांसाठी उत्पादनक्षम राहणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. करिता, महसूल विभाग, कृषी विभाग आणि जलसंधारण विभागाने नाला खोलीकरणाची कामे सुरू करून शेतकऱ्यांना सुपीक गाळ पुरवावा, असा आग्रह संबंधितांकडे धरण्यात आला आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/f5Y2EqM
नाला खोलीकरण करून सुपीक गाळ शेतांना द्या:अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जमिनींसाठी तातडीने उपाययोजना हवी; शेतकऱ्यांची मागणी
November 15, 2025
0