Type Here to Get Search Results !

संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम निकृष्ट?:हर्षवर्धन पाटलांची नितीन गडकरींकडे तक्रार, चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे गडकरींचे आश्वासन

वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप करत, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या, माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. देहू ते पंढरपूर या पवित्र मार्गाचे काम सध्या राष्ट्रीय महामार्ग 965 अंतर्गत सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून काही ठिकाणी ते निकृष्ट दर्जाचे झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांनी गडकरींकडे केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत: १. पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत. २. आतापर्यंत झालेल्या निकृष्ट कामांची सखोल चौकशी करण्यात यावी. ३. वारकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि वृक्षारोपणाचे काम दर्जेदार असावे. हर्षवर्धन पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालखी मार्गाच्या निकृष्ट कामांची चौकशी केली जाईल आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले जातील, असे आश्वासन गडकरी यांनी या भेटीदरम्यान दिले. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा देहूपासून सुरू होऊन पंढरपूरपर्यंत जातो. लोणी काळभोर, यवत, इंदापूर, बारामती आणि अकलूज यांसारख्या महत्त्वाच्या गावांमधून जाणारा हा मार्ग आषाढी वारीसाठी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी जीवनवाहिनी आहे. वारकऱ्यांचा पायी प्रवास सुखकर व्हावा, यासाठी केंद्र सरकारने या मार्गाचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण हाती घेतले आहे. मात्र, कामाच्या दर्जाबाबत खुद्द स्थानिक नेत्यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने आता गडकरी काय ॲक्शन घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/oZksivO

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.