भाजपने टाकलेली अट स्पष्टपणे नाकारत अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मुंबई मनपा निवडणूक माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वातच लढणार आहे. त्यामुळे मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवाबच मालिक असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, मलिक यांच्या कन्या, आमदार सना मलिक यांनी भाजप नेते, मंत्री आशिष शेलार यांच्या वक्तव्यांना प्रत्युत्तर दिले आहे. “आरोप झाले म्हणजे कुणी गुन्हेगार ठरत नाही. आशिष शेलार वकील असूनही अशी विधाने कशी करतात? संविधानानुसार जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत नवाब मलिक निर्दोषच आहेत,’ असे त्या म्हणाल्या. राज्यात उद्धव ठाकरेंचे सरकार असताना नवाब मलिक मंत्री होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मलिक यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदीचा आरोप केला होता. त्यामुळे मलिक तुरुंगात गेले होते. तोच मुद्दा पुढे करत शेलार यांनी सांगितले की, मलिक यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीशी आम्ही युती करणार नाही. त्यावर अजित पवारांनी मलिक यांना बाजूला हटवण्यास नकार दिला. सूत्रांनी सांगितले की, बुधवारी तीन तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर पक्षाने दोन स्वतंत्र अहवाल तयार केले आहेत. युती झाल्यास जागावाटपाचा फॉर्म्युला. युती न झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी. हे दोन्ही अहवाल लवकरच अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसमोर ठेवले जाणार आहेत. भाजपला माघार घेणे अशक्य उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असताना नवाब मलिकांवर फडणवीसांनी तुफान हल्ला केला होता. मलिक यांचे देशद्रोही लोकांशी कनेक्शन आहे, असा आरोप भाजपकडून केला जात होता. त्या आरोपापासून माघार घेणे भाजपला आता अशक्य आहे. मुंबईमध्ये ते अत्यंत महागात पडू शकते. म्हणूनच मलिक यांना सोबत घेण्यास आशिष शेलार यांच्यासह भाजपचे सर्व स्थानिक पदाधिकारी कडाडून विरोध करत आहेत. सना मलिक असतील अधिक सक्रिय सूत्रांनी सांगितले की, गेल्या महिनाभर उमेदवार अर्ज आणि मुलाखतीसाठी नवाब मलिक यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वातच अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मुंबई मनपा लढणार आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आणि रणनीती ठरवण्यात नवाब मलिक यांच्या तुलनेत त्यांच्या कन्या आमदार सना मलिक अधिक सक्रिय असतील. अजित पवार गटाला महायुतीबाहेर ठेवणे ही भाजपची ‘रणनीती’! मुंबईत अजित पवार गटाला सोबत न घेणे ही भाजपची रणनीती आहे. मुंबईत केवळ अणुशक्तिनगर आणि वांद्रे या मुस्लिमबहुल भागांतच अजित पवारांची ताकद आहे. मुस्लिम मतदारांचा ओढा उद्धवसेना, काँग्रेसकडे आहे. त्यात अजित पवार गट स्वतंत्र लढल्यास दलित-मुस्लिम मतांचे विभाजन होईल. त्याचा फायदा भाजप-शिंदेसेनेला मिळू शकतो, असे गणित मांडून नवाब मलिकांना पुढे केले जात आहे.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ytf2Cb6
मुंबईत राष्ट्रवादीचे ‘मालिक’ नवाबच:अजित पवारांचा पक्ष मुंबई मनपा मलिकांच्या नेतृत्वातच लढणार
December 17, 2025
0