मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण प्रचंड तापले असून वरळी मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. "वरळी हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे, असे म्हणण्याचे काहीच कारण नाही. आम्ही देखील तीन-तीन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून येतो आणि ही निवडणूक काही लहान मुलांबरोबर वाद घालण्याची नाही," अशा बोचऱ्या शब्दांत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर टीकास्त्र सोडले. आदित्य-अमित बेरोजगार होतील, म्हणून ठाकरे बंधू एकत्र आलेत, अशी टीकाही नीतेश राणे यांनी केली. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीवर टोला लगावताना नितेश राणे म्हणाले, "आपण एकत्र आलो नाही तर दोघेही बेरोजगार होऊन जातील, या भीतीने हे दोन भाऊ आता एकत्र आले आहेत." तसेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले की, जसा नेता आहे तसाच इथला त्यांचा उमेदवार आहे. हिंदुत्वाशी तडजोड केल्याचा आरोप बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आठवण करून देत राणे यांनी उबाठा गटावर विखारी टीका केली. "बाळासाहेबांनी कधीच हिंदुत्वाशी तडजोड केली नाही, म्हणूनच मुंबईतील मराठी माणूस दंगलीत वाचला. मात्र, आज पक्षामध्ये कोणाला घेतले जात आहे? बॉम्बस्फोटाचे आरोपी आणि 'हिरव्या सापांना' पक्षात स्थान दिले जात आहे. जर आज बाळासाहेब असते, तर अशांचे वाभाडे काढत त्यांना पक्षात स्थान दिले नसते," अशा शब्दांत नीतेश राणे यांनी समाचार घेतला. मराठी टक्का का घसरला? मुंबईतील मराठी माणसाच्या प्रश्नावर बोलताना राणे यांनी विचारले की, "तुमच्या सत्तेत मुंबईतील मराठी माणसाचा टक्का का घसरला? जर चुकून यांची पुन्हा सत्ता आली, तर मुंबईत आपली मंदिरेही सुरक्षित राहणार नाहीत." ही निवडणूक केवळ राजकीय नसून आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचे त्यांनी नागरिकांना पटवून दिले. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी जे जे आवश्यक आहे, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पूर्ण केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कलानगरमध्ये फटाके वाजवणार "मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार," असा ठाम विश्वास व्यक्त करत नितेश राणे यांनी ठाकरेंना थेट आव्हान दिले. "माझी इच्छा आहे की एकदा आमने-सामने व्हायला हवे, मग बघू आवाज कुठून निघतो," अशा शब्दांत त्यांनी थेट चॅलेंज दिले. तसेच, महायुतीचा उमेदवार निवडून आल्यावर आपण स्वतः विजयाची मिरवणूक काढू आणि फटाक्यांची एक माळ 'कलानगर'मध्ये (ठाकरे निवासस्थान) जाऊन लावू, असा टोलाही त्यांनी लगावला. उत्तर भारतीयांना भाजप-शिंदेसेनेशिवाय पर्याय नाही दरम्यान, नितेश राणे यांनी वसई विरार येथील सभेत बोलताना देखील मोठे विधान केले. उत्तर भारतीयांना सुरक्षा हवी असेल तर त्यांनी भाजपा आणि शिंदेसेनेला मतदान करावे असं आवाहन करत त्यांनी उद्धवसेना-मनसेलाही थेट धमकी दिली आहे. वसई विरारमध्ये राहणाऱ्या उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांना सुरक्षा हवी असेल तर त्यांना भाजपा आणि शिंदेसेनेशिवाय पर्याय नाही. कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्याला जागा दाखवण्याचं काम आमच्या खांद्यावर तुम्ही टाका हा विश्वास मी तुम्हाला देतो. इतर जे पक्ष आहेत ते केवळ राजकारण करायला येतील परंतु उद्धवसेना असेल, राज ठाकरेंच्या मनसेचे लोक तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहतात तेव्हा तुम्हाला कुणी वाचवायला येत नाही. तुमच्यासाठी जर कुणी उभा असेल, तुम्हाला ताकद देत असेल तर ते फक्त भाजपा आणि शिंदेसेनेचे लोक आहेत असं त्यांनी सांगितले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/gbZToQc
आदित्य-अमित बेरोजगार होतील म्हणून ठाकरे बंधू एकत्र आले:नीतेश राणेंची वरळीत तुफान फटकेबाजी, हिंदुत्वाशी तडजोड केल्याचा आरोप
January 10, 2026
0