Type Here to Get Search Results !

शिवाजी महाराजांच्या 'सुरत लुटी'चा राग आजही काहींच्या मनात:मुंबई तोडण्याचा डाव ओळखा, जयंत पाटलांचा भाजपवर प्रहार

मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत आज शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) 'ठाकरे बंधूंच्या' ऐतिहासिक संयुक्त सभेने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. या सभेत महाविकास आघाडीची ताकद म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी भाजपवर कडाडून टीका केली. "साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती, त्याचा राग आजही काहींच्या मनात जिवंत आहे, हे विसरू नका," अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या धोरणांवर हल्ला चढवला. तसेच मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव पुन्हा एकदा सुरू झाला असून मराठी माणसाने सावध राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १९ वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच राजकीय मंचावर आल्याने शिवाजी पार्कात जनसागराचा उत्साह शिगेला पोहोचला होता. जयंत पाटील यांच्या उपस्थितीने महाविकास आघाडीतील समन्वय देखील अधोरेखित झाला. मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी ही युती निर्णायक ठरेल, असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. जयंत पाटील यांच्या या आक्रमक भाषणामुळे निवडणुकीच्या मैदानात आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. नेमके काय म्हणाले जयंत पाटील? भाजप नेते अण्णामलाई यांच्या मुंबईतील विधानाचा संदर्भ देत जयंत पाटील यांनी गंभीर इशारा दिला. "अण्णामलाई इथे येऊन काय बोलले? त्यांची भूमिका मुंबई महाराष्ट्राची नाही अशीच दिसते. यावरून मुंबई पुन्हा एकदा तोडण्याचा डाव आखला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा राग मनात धरून काही लोक मुंबईवर घाला घालत आहेत. अशा वेळी आपण सर्वांनी एकत्रितपणे सावध होऊन या संकटाचा सामना केला पाहिजे," असे आवाहन पाटील यांनी केले. आदित्य ठाकरेंचे जयंत पाटलांकडून कौतुक या सभेत जयंत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या कार्यशैलीचे मुक्तकंठाने कौतुक केले. उद्धव ठाकरे यांना उद्देशून ते म्हणाले, "उद्धवजी, तुम्ही सभेला उशिरा आलात, पण त्याआधी मी आदित्य ठाकरेंचे अत्यंत आक्रमक आणि मुद्देसूद भाषण ऐकले. मुंबईची नस, मुंबईला काय हवे आहे आणि मुंबईच्या समस्या काय आहेत, याची ओळ न् ओळ आदित्यला ठाऊक आहे. त्यामुळे आता तुम्ही मुंबईची संपूर्ण जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे सोपवा आणि तुम्ही स्वतः पूर्ण महाराष्ट्राकडे लक्ष द्या." आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी मुंबईच्या भविष्याची सूत्रे त्यांच्याकडे देण्याचा सल्ला दिला. दोन्ही भाऊ एकत्र आल्याचा संपूर्ण मुंबईला आनंद दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाचे स्मरण करताना जयंत पाटील भावूक झाले. "बाळासाहेबांच्या शब्दांमुळेच मुंबई मराठी माणसाची आहे, ही भावना देशपातळीवर पोहोचली. त्यांच्यामुळेच या शहरात मराठी माणूस आजही स्वाभिमानाने आणि ठामपणे उभा आहे, हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही," असे ते म्हणाले. मंचावरील 'राज-उद्धव' एकत्र असलेले पोस्टर पाहून मनाला आनंद होत असल्याचे सांगत ते म्हणाले की, "आज केवळ कार्यकर्त्यांनाच नाही, तर संपूर्ण मुंबईला आनंद झाला आहे की अखेर 'भावकी' एक झाली आहे. ही एकजूट आता मुंबईचा विजय सुकर करेल."

from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/hwr9cdk

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.