राजकीय वर्तुळात अत्यंत गाजलेला मंत्री दादा भुसे आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यातील १७८ कोटींच्या कथित घोटाळ्याचा कायदेशीर लढा अखेर संपुष्टात आला आहे. मालेगाव न्यायालयात राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर दादा भुसे यांनी आपला मानहानीचा खटला मागे घेतला. मात्र, या प्रकरणावरून भाजपने केलेल्या टीकेला उत्तर देताना राऊत यांनी, "आरोप करणाराच आता भाजपमध्ये असल्याने आम्ही कशाला रक्त आटवायचे?" असा खोचक टोला लगावला आहे. २२ जून २०२५ रोजी 'सामना'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमुळे हा वाद पेटला होता. गिरणा सहकारी कारखान्याच्या शेअर्समध्ये १७८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी तत्कालीन कृषीमंत्री दादा भुसे यांच्यावर केला होता. हे आरोप अद्वय हिरे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आले होते. याप्रकरणी भुसे यांनी राऊतांविरुद्ध मालेगाव न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. शनिवारी झालेल्या सुनावणीवेळी संजय राऊत यांनी न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले. या आरोपांमध्ये कोणतीही सत्यता नसल्याचे निदर्शनास आल्याने राऊतांनी माफी मागितली. राऊतांच्या या भूमिकेनंतर आणि त्यांनी दाखवलेल्या दिलगिरीनंतर दादा भुसे यांनी सामोपचाराने हा खटला मागे घेण्याची विनंती केली, जी न्यायालयाने मान्य केली. या घडामोडीनंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी, "माफी मागून आनंदी झालेला जगातला पहिला माणूस," अशा शब्दांत राऊतांना डिवचले. यावर संजय राऊतांनी सोशल मीडियावरून पलटवार केला. नेमके काय म्हणाले संजय राऊत? अतुल जी, माणसाने पाप केले नसेल तर तो नेहमीच आनंदी राहील, असे संजय राऊत म्हणाले. दादाजी भुसे यांच्यावर मूळ आरोप अद्वय हिरे यांचे होते. त्यांनी गिरणा कारखान्यातील व्यवहाराबाबत आधीच खटला दाखल केला आहे. हिरे यांनी आता भाजपात प्रवेश केल्या मुळे हा खटला चालवण्याची जबाबदारी भाजपची आहे. आम्ही का रक्त आटवायचे? आम्ही या खटल्यातून आनंदाने आणि हसत हसत बाहेर पडलो आहोत समजलं? असा टोलाही संजय राऊत यांनी अतुल भातखळकर यांना लगावला. प्रवासाचे कारण आणि राजकीय सोय संजय राऊत यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे लांबचा प्रवास जमत नसल्याचेही न्यायालयात नमूद केले होते. दुसरीकडे, ज्या अद्वय हिरे यांच्या माहितीवरून हा सर्व गदारोळ झाला, तेच आता भाजपमध्ये गेल्याने या खटल्याला राजकीयदृष्ट्या फारसे महत्त्व उरले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच 'समजूतदारपणा' दाखवत दोन्ही नेत्यांनी हा कायदेशीर लढा संपवण्यावर शिक्कामोर्तब केले.
from महाराष्ट्र | दिव्य मराठी https://ift.tt/ZXDsK5y
अद्वय हिरेंसाठी आम्ही रक्त का आटवायचे?:खटला आता भाजपचा, संजय राऊत यांचा अतुल भातखळकरांवर पलटवार
February 21, 2026
0